चिकित्सक पत्रकारिता व विश्लेषणात्मक लेखनशैलीचा आयाम मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये रुजवणारे आणि मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान ही संकल्पना प्रथम राबवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे सोमवारी मुंबईत अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. करमरकर अविवाहित होते. काही महिने ते आजारी होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी शुश्रुषागृहात दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. करमरकर यांच्या पार्थिवावर अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

…म्हणून ठरले ‘क्रीडा पानाचे जनक’!

करमरकर यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. १९६०च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. १९६२मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे दैनिक सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या चमूमध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा. भ. कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

विशेष संपादकीय: क्रीडाभारताचा ‘संजय’ !

करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानेसुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, अर्थशास्त्रात एम.ए. करत असताना करमरकरांनी क्रीडा पत्रकारितेची वेगळी वाट निवडली. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीतही हा प्रयोग राबवला पाहिजे, यासाठी त्यांनी आपली लेखणी प्रभावी आणि प्रवाहीपणे चालवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक यांच्याप्रमाणे गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाला.

समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा आणि चिकित्सेचा आग्रह धरला. नकली प्रसिद्धी आणि संवगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढे जायला हवे, याविषयी ते आग्रही असत. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खो-खो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या-त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खो-खो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. खो-खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची कवाडे खो-खो खेळाडूंना उघडली गेली!

‘ना खंत ना खेद’सारखे स्तंभ विशेष वाचकप्रिय!

क्रीडास्पर्धांच्या ‘इव्हेंटीकरणा’चा त्यांना विलक्षण तिटकारा होता. क्रिकेटमध्ये आपण प्रगती करत असलो, तरी ते विश्व खूप छोटे आहे. याउलट ऑलिम्पिक आणि आशियाईसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरीच्या निकषांवर आपण छोट्यात छोट्या आणि गरीब देशांपेक्षा कितीतरी मागे आहोत, हे त्यांनी सतत मांडले. ‘ना खंत ना खेद’सारखे त्यांचे स्तंभ त्यांतील परखड, चिकित्सक लिखाणामुळे वाचकप्रिय बनले.

क्रीडा पान उभे करायचे तर त्यासाठी बातम्या आणल्या पाहिजेत. फिरले पाहिजे. खेळाच्या मैदानांवर वावरले पाहिजे आणि खेळाडू-संघटकांशी बोलत राहिले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे. क्रीडा पान वाचकप्रिय करण्याआधी ते वाचकसुलभ बनवले पाहिजे, हे त्यांनी फार पूर्वी हेरले. धावफलक, चौकार, षटकार, धावचीत, यष्टिचीत असे अनेक शब्द करमरकरांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेट वृत्तामध्ये दिसू लागले. नेमके व परखड लिहिणे आणि बोलणे हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले. त्यामुळेच आकाशवाणी समालोचक म्हणूनही ते लोकप्रिय बनले. वलयांकित क्रीडापटूंचे वृत्तांकन करणे किंवा त्यांच्या मुलाखती घेणे म्हणजे त्यांचे मिंधेपण स्वीकारणे नव्हे, हे ते आपल्या सहकाऱ्यांना सतत बजावायचे.

सुरेश कलमाडींसारख्या राजकीय दृष्ट्या वजनदार क्रीडा संघटकांची पत्रास करमरकर यांनी कधी बाळगली नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यावर त्यांनी भरभरून लिहिले. पनवेलमध्ये दहाएक देशांना गोळा करून कबड्डीचा विश्वचषक भरवणाऱ्या मंडळींवरही त्यांनी यथेच्छ टीका केली. करमरकरांच्या या अनेक गुणांमुळे ते स्वतः एक चालतीबोलती संस्था बनून गेले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेतीलच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला, अशी भावना म्हणूनच व्यक्त होत आहे.