मुंबई : ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’साठी निवड करण्यात आलेल्या नऊ दुर्गांच्या सत्कार सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपस्थित राहणार असून येत्या मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, दादर येथील ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ६.१५ वाजता सुरू होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा सर्वांसाठी खुला असणार आहे.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ दुर्गांचा गौरव केला जातो. यंदा या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे.

निवड झालेल्या यंदाच्या ‘दुर्गा’ आहेत, सूक्ष्म जैवतंत्रज्ञानातून शाश्वत विकास घडवणाऱ्या वैज्ञानिक डॉ. आरोही कुलकर्णी, ‘अप्लाइड एन्व्हायरन्मेंटल रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराया, आणि हजारो एकर खासगी जंगलांचे संरक्षण करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले, मोहरी आणि जवस पिकावर संशोधन करून शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवणाऱ्या डॉ. बीना नायर, नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायतीतील गावांना विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या युवा सरपंच भाग्यश्री लेखामी, ग्रामीण महाराष्ट्रातील सुमारे १८ लाख स्त्रियांना ‘माविम’च्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या कुसुम बाळसराफ, भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’, ‘सॉलिड स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर’ तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. मंजिरी पांडे, लोकांच्या सहभागातून ७५ हून जास्त तलावांचे पुनरुज्जीवन आणि ५९ स्थानिक माशांच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या शालू कोल्हे, कोकण किनारपट्टीवरील ‘सी स्पंज’ या जलचर प्राण्यांवर संशोधन करून त्यांच्या १९ प्रजाती शोधणाऱ्या, ‘फिशिंग प्रेशर’चा अभ्यास करून मत्स्य उत्पादन वाढवण्यास हातभार लावणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते, आणि ‘निर्माण’ संस्थेच्या माध्यमातून १५ हजार भटक्या-विमुक्त वर्गातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वैशाली भांडवलकर.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या निवड समितीमध्ये स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या शारदा साठे, पत्रकार, लेखिका, नाट्य-चित्रपट अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार विजेत्या आणि सुप्रसिद्ध कठपुतळी कलाकार, अभिनेत्री मीना नाईक यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे खास आकर्षण

या वेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्री कलाकारांच्या वाद्यवृंदीय आविष्काराचा आनंदही उपस्थितांना घेता येईल. या कार्यक्रमात भावना अंकुश, अमृता ठाकूरदेसाई, फेणी भावसार, राधिका अंतुरकर, प्रेषिता मोरे, विनिता जाधव, सुलक्षणा फाटक, शलाका देशपांडे, कौशिकी जोगळेकर या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता पेंडसे आणि कुणाल रेगे करणार असून संयोजन ‘आर्च एंटरप्राइजेस’ यांचे आहे.

कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल. काही जागा राखीव असतील.