अर्थसंकल्पाचे भांडवली बाजाराकडून स्वागत    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे भांडवली बाजाराने स्वागत केले आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसंबंधी करण्यात आलेल्या मोठय़ा घोषणांमुळे धातू आणि भांडवली वस्तू समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्यांची तेजी दर्शविली. जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामुळे बाजाराला अधिक बळ मिळाले.

मंगळवारच्या सत्रात बाजारात मोठे नाटकीय चढ-उतार झाले. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सुमारे ९५० हून अधिक अंशांची झेप घेत ५९,०३२.२ अंशांच्या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. त्यांनतर दुपारच्या सत्रात पुन्हा नकारात्मक पातळीत प्रवेश करत ५७,७३७.६६ अंशांचा तळ गाठला. मात्र पुन्हा एकदा तेजीवाल्यांनी जोर लावल्याने दिवसअखेर सेन्सेक्स ८४८.४० अंशांनी वधारून ५९,०३२.२० पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३७ अंशांची वाढ झाली. तो १७,५७६.८५  पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग ७.५७ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ सन फार्मा, इंडसइंड बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि एचसीएल टेकचे समभाग तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे मिहद्र अँड मिहद्र, पॉवर ग्रीड, स्टेट बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाली.

सीतारामन यांनी ३९.४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात विकासाचे इंजिन म्हणून काम करणारे रस्ते-महामार्ग, परवरडणारी घरे आणि पायाभूत सुविधांच्या योजनांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परिणामी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यास अर्थव्यवस्था सक्षम असेल.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अतिशय संतुलित अर्थसंकल्प सादर केला असून गेल्या अर्थसंकल्पातील वाढ केंद्रित  दृष्टीकोन कायम ठेवला आहे. राष्ट्रीय उत्पादन क्षमता आणि अक्षय्य ऊर्जा विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देत कोणताही नवीन करभार लादण्यात आलेला नाही, असे 

मत मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty share market budget is welcomed by the capital market akp
First published on: 02-02-2022 at 00:34 IST