लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाच्या अशा ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गासाठी स्वतंत्र पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा आणि प्रकल्पस्थळी पाणी साचू नये याची काळजी २४ तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षामार्फत घेण्यात येणार आहे.
नवी मुंबई आणि डोंबिवलीदरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने १२.३० किमी लांबीच्या ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली – डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. या प्रकल्पात वा प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात पावसाळ्यात काही अडचणी येऊ नयेत यासाठी एमएमआरडीएने स्वतंत्र २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
आणखी वाचा-Biparjoy Cyclone : चार वाजता बिपरजॉय धडकणार गुजरातच्या किनाऱ्याला; मुंबईवर काय होणार परिणाम?
एमएमआरडीएकडून दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो. या कक्षाद्वारे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पस्थळ तसेच आसपासच्या परिसरातील पावसाळ्याशी संबंधित सर्व अडचणी दूर केल्या जातात. या नियंत्रण कक्षासोबतच आता एमएमआरडीएने ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. प्रकल्पस्थळी अधिकारी – कर्मचारी तैनात असणार असून ते तेथील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.