मुंबई : ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महान संत सखुबाई यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे संत सखुबाई या कराडमधील असल्याने तेथील ग्रामस्थ मालिका आवर्जून पाहत आहेत.

विठ्ठलाच्या निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखुबाईंचे नाव महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीत आदराने घेतले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात कराड येथे संत सखूबाईंचे एकमेव मंदिर आहे. ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत सखुबाई यांच्या बालपणीची भूमिका स्वराली खोमणे साकारत असून, तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. स्वरालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी साऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

स्वरालीचे कौतुक करण्यासाठी कराडमधील संत सखुबाई मंदिर आणि विठ्ठलदेव व त्र्यंबक देव ट्रस्ट येथून संजीव सराटे, शार्दुल चरेगावकर आणि सुरेंद्र काळे हे मान्यवर थेट मालिकेच्या सेटवर पोहोचले. योगायोग म्हणजे त्याच दिवशी स्वरालीचा वाढदिवस असल्याने सेटवर केक कटिंग करत जोरदार सेलिब्रेशनही पार पडले.

‘सखा माझा पांडुरंग’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होत आहे. ‘सखा माझा पांडुरंग’ सेटवर पोहोचल्यानंतर संजीव सराटे आणि शार्दुल चरेगावकर म्हणाले की, ‘संत सखुबाई’ या अशा संत आहेत ज्यांना प्रत्यक्ष विठुरायाचा सहवास लाभला. त्यांच्यावर आधारित मालिका आजच्या काळात येणे गरजेचे होते आणि ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेमुळे हे शक्य होत आहे. आमच्या गावासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

मालिका खूप सुंदर पद्धतीने सुरू आहे. त्यात स्वराली ही बालकलाकार म्हणून तिचे काम उत्तमरित्या करीत आहे. त्यामुळेच आज आम्ही कराडवरून मुंबईमध्ये आलो आहोत. संत सखुबाई यांचा जीवनप्रवास अनुभवण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल ‘सन मराठी’ वाहिनीचे आणि मालिकेत मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. मालिकेच्या माध्यमातून संत सखूबाईंची कथा त्यांचा प्रवास घराघरात पोहोचला पाहिजे’.