मुंबई : मालकाची १३ वर्षांची मुलगी व ११ वर्षांच्या पुतणीचे कपडे बदलताना लपून चित्रीकरण करणाऱ्या २७ वर्षीय नोकराला माता रमाबाई आंबेडकर (एम.आर.ए.) मार्ग पोलिसांनी अटक केली. गेल्या नोव्हेंबरपासून आरोपी हा प्रकार करीत होता. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना काही चित्राफितीही सापडल्या आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा झारखंड येथील रहिवासी आहे. तो अविवाहित असून तक्रारदार कुटुंबाकडे गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ नोकर म्हणून कामाला होता. त्यामुळे तो कुटुंबाचा अत्यंत विश्वासू व्यक्ती होता. ३८ वर्षीय तक्रारदार महिला फोर्टमध्ये राहतात आणि त्यांचे भेटवस्तू विक्रीचे दुकान आहे. तक्रारदार महिला व त्यांचे पती कामावर गेल्यानंतर नोकर त्यांच्या मुलीची घरी काळजी घ्यायचा. तर तक्रारदारांची पुतणी शनिवार-रविवार त्यांच्या मुलीसोबत खेळण्यासाठी घरी यायची.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तक्रारदारांची मुलगी आरोपीच्या मोबाइलशी खेळत असताना त्याच्या मोबाइलच्या गॅलरीमध्ये त्यांची छायाचित्रे आढळली. तसेच तिच्या चुलत बहिणीचे छायाचित्रही तिने पाहिले. त्यानंतर तिने आईला याबाबत माहिती दिली.
तक्रारदार महिलेने नोकराचा मोबाइल तपासला तेव्हा त्यांना मुलगी आणि पुतणीचा कपडे बदलत असतानाचे छायाचित्र, आंघोळ करतानाचे छायाचित्र आढळले. आरोपीने त्यांचे लपून चित्रीकरणही केले होते व त्याचे स्क्रीन शॉट काढले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तक्रार नोंदवून नोकराविरोधात भारतीय दंड संहितेच्या ३५४ (क) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
मंगळवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. यापूर्वी आरोपीविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी संकेतस्थळ व समाजमाध्यमांवर नियमित अश्लील मजकूर पाहत असल्याचे त्याच्या मोबाइलवरुन उघडकीस आले आहे.