मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र; उपायुक्त संगीता हसनाळे यांची बदली रद्द

अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे

मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र; उपायुक्त संगीता हसनाळे यांची बदली रद्द
(संग्रहीत छायाचित्र)

राज्यातील सत्तातरांतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिकेतील उपायुक्त संगीता हसनाळे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून परिमंडळ १ च्या उपयुक्त पदी बदली करण्यात आली होती. मात्र पाचच दिवसात त्यांची बदली रद्द करून त्यांना परिमंडळ १ आणि घनकचरा व्यवस्थापन दोन्ही पदांचा कार्यभार देण्यात आला आहे.

महापालिकेतील बदल्या राजकीय आकसाने होत असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले किरण दिघावकर यांची ४ जुलैला दादर, माहिम परिसरातून भायखळा परिसरातील ई विभागात बदली करण्यात आली होती. मात्र एका महिन्याभराने त्यांची दुसऱ्यांदा बदली करून त्यांना मालाडचा भाग असलेल्या पी उत्तरमध्ये बदली करण्यात आली आहे. याच बदली दरम्यान उपयुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.

दक्षिण मुंबईचा समावेश असलेल्या परिमंडळ १ च्या उपायुक्त चंदा जाधव यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर घनकचरा व्यवस्थापनच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांची परिमंडळ १ मध्ये बदली करण्यात आली होती. मात्र या बदलामुळे हसनाळे नाराज होत्या असे समजते. टाळेबंदीच्या काळातच त्यांना करनिर्धारण विभागातून घनकचरा व्यवस्थापन विभागात आणण्यात आले होते. त्यातच आता त्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यांच्या नाराजीमुळे त्यांची बदली रद्द झाली असून त्यांना घनकचरा व्यवस्थापनच्या उपायुक्तपदी ठेवण्यात आले आहे. तसेच परिमंडळ १ चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र त्यामुळे परिमंडळ १च्या उपायुक्त असलेल्या चंदा जाधव यांना आता कोणता पदभार देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Breaking : बोरीवलीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी