महायुतीत राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने’ प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढली असून एकीकडे बळकट महायुती तर दुसरीकडे ‘आम आदमी पार्टी’ च्या आव्हानाचा सामना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत करावा लागणार आहे. नाशिक येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या साऱ्याचा आढवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत.
महायुतीत मनसेने सामील व्हावे यासाठी कालपर्यंत प्रयत्न करणाऱ्या भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनीही महायुतीत आता मनसेला स्थान नाही, असे जाहीर केल्यामुळे राज्यातील आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याशिवाय मनसेपुढे आता पर्याय रहिलेला नाही.
मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे मनसेसाठी महत्त्वाचे असून विदर्भात आणि मराठवाडय़ात कोणत्या जागा लढवता येतील याचा आढावा मनसेच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जोर प्रमुख्याने कोल्हापूर, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भातील काही भागात असल्याचा फायदा महायुतीला मिळेल, असे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
पक्षबांधणीच्या दृष्टीने विदर्भासह ग्रामीण भागात मनसे कमकुवत असल्यामुळे सारी भिस्त राज ठाकरे यांच्या करिष्म्यावर असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महाराष्ट्रात लोकसभेच्या ११ जागा लढविल्या होत्या व त्यांना १५ लाख मते मिळाली होती. आम आदमी पार्टीने राज्यातील सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या केलेल्या घोषणेच्या पाश्र्वभूमीवर मनसेलाही जास्तीत जास्त जागा लढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मनसेच्या एका आमदाराने मान्य केले. मनसेची ताकद नाही, असे जर महायुतीच्या नेत्यांना वाटत होते तर कालपर्यंत मनसेला महायुतीत सामील करण्यासाठी भाजपचे नेते राज ठाकरे यांचा दरवाजा का ठोठावत होते, असा सवाल करून काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेना-भाजपवर लोकांचा विश्वास नसल्याचे मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘स्वाभिमानी’मुळे मनसेची वाट बिकट !
महायुतीत राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने’ प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढली असून एकीकडे बळकट महायुती तर दुसरीकडे

First published on: 09-01-2014 at 02:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setback to mns as raju shettys swabhimani shetkari sanghatana joins sena bjp