अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील बंगल्यावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी सुमारे आठशे चाहते जमले होते. त्यातील दोन चाहत्यांचे महागडे आय फोन चोरीला गेले असून पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. शाहरुख खान याला पाहण्यासाठी बँडस्टँड येथील मन्नत बंगल्याबाहेर सुमारे आठशे लोक जमले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास खान आपल्या बंगल्याच्या गच्चीत आला आणि त्याच्या चाहत्यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या. वांद्रे पोलीस ठाण्यातील ४० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. पण गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाईल चोरले. याबाबत एक पुरुष आणि एका महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार केली आहे. याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे आयफोन चोरीला गेले. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या गर्दीत मोबाईल चोरीला जाण्याची, ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये किमान १२ चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. २०१९ मध्ये दोन चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते.