महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी जुलै महिन्यात टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महिला पत्रकारावरील बलात्काराच्या खटल्याची शिक्षासुनावणी सोमवारी होणार आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात शक्ती मिल परिसरात पाच नराधमांनी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात याच परिसरात एका महिला पत्रकारावर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणी पाच जणांना न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले होते. त्यातील टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार खटल्याची सुनावणी शुक्रवारी झाली. यातील आरोपी विजय जाधव, मोहम्मद कासीम हाफीज शेख ऊर्फ कासीम बंगाली, मोहम्मद अन्सारी आणि मोहम्मद अश्फाक शेख या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तत्पूर्वी, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली. आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत पायाच्या शस्त्रक्रियेमुळे आधीच वेदनांनी त्रस्त असलेल्या पीडित तरुणीवर अमानुष बलात्कार केला. तिला मारहाणही केली. ती अद्यापही त्या धक्क्यातून सावरलेली नाही. साक्षीच्या वेळीही तिची ही अवस्था न्यायालयापासून लपलेली नाही, असे निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी चारही आरोपींना शिक्षा सुनावली.
सोमवारी सुनावणी
वरील दोन्ही प्रकरणांमधील पाचपैकी तीन आरोपींना न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी दोषी धरले असल्याने वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावण्याआधी सुधारित कायद्यानुसार आरोपींवर नवा आरोप ठेवण्याची मागणी निकम यांनी केली. या मुद्दय़ावर बाजू मांडण्यास आरोपींच्या वतीने सोमवार, २४ मार्चपर्यंत वेळ मागून घेतल्याने त्या दिवशी शिक्षा सुनावली जाईल.
निकालपत्र..
काही प्रकरणांमध्ये आरोपींचे वय, त्यांची आर्थिक स्थिती, गुन्हा त्यांनी कुठल्या परिस्थितीत केला आदीचा विचार करून शिक्षेत दया दाखवली जाते. बलात्काराचा गुन्हा गंभीर आणि क्रूर असून संबंधित स्त्री व समाजावर त्याचा खोलवर परिणाम होत असतो.
जीवन जगण्याच्या संबंधित स्त्रीच्या मूलभूत अधिकारावरही घाला घातला जातो. आरोपींनी ज्या प्रकारे बलात्कार केला आहे तो पाहता त्यांची विकृत मनोवृत्तीच पुढे येते. त्यांनी पीडित तरुणीची पराकोटीची लैंगिक छळवणूक करून तिला मानसिकदृष्टय़ा हेलावून सोडले आहे.कुठलीही व्यवस्था कुणालाही गुन्हेगार बनवत नसते. या आरोपींना दया दाखवली जाऊ शकत नाही. तसे केल्यास न्यायाची खिल्ली उडविण्यासारखे होईल.