पालिका कर्मचाऱ्यांना बक्कळ बोनस मिळवून देण्याचा आग्रह धरणारे कामगार नेते शरद राव यांनी सोमवारी घूमजाव करीत पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या १२,५०० रुपये सानुग्रह अनुदानाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र कामगार संघटनांना डावलून प्रभारी आयुक्त आणि महापौरांनी केलेल्या बोनसच्या घोषणेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेप्रमाणेच बोनस द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी आझाद मैदानावरील सभेत केली.
पालिका कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये, आरोग्य स्वयंसेविकांना ३,५०० रुपये, अनुदानित शाळांतील शिक्षकांना ६,२०० रुपये, तर कंत्राटी कामगारांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा गुरुवारी महापौर सुनील प्रभू आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे रजेवर असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी गुरुवारी केली. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी केली होती. मात्र महापौर आणि प्रभारी पालिका आयुक्तांनी अचानक १२,५०० सानुग्रह अनुदानाची घोषणा करून कामगार संघटनांच्या मागणीमधील हवाच काढून टाकली. बोनसच्या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. परंतु या मोर्चामध्ये जाहीर झालेल्या बोनसबाबत शरद राव यांनी समाधान व्यक्त केले. मात्र कामगार संघटनांना डावलून सानुग्रह अनुदान जाहीर केल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. महापौर आणि पालिका आयुक्त सानुग्रह अनुदानाची घोषणा करतात. परंतु सुबोधकुमार यांनी ही प्रथाच मोडीत काढली आहे. ही प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शरद राव यांनी केली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत घोषणा झाल्याने आता शरद राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी ललकारी दिली आहे. पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गेल्या वर्षीचा बोनसही त्यांना द्यावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. या संदर्भात शरद राव यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मात्र, बेस्ट आजही आर्थिक संकटातून बाहेर पडलेली नाही. त्यामुळे यंदाही बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल की नाही याबाबत साशंकताच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2013 रोजी प्रकाशित
महापौर-प्रशासनाने बोनसची घोषणा केल्याने शरद रावांचे घूमजाव
पालिका कर्मचाऱ्यांना बक्कळ बोनस मिळवून देण्याचा आग्रह धरणारे कामगार नेते शरद राव यांनी सोमवारी घूमजाव करीत पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या १२,५०० रुपये सानुग्रह अनुदानाबाबत समाधान व्यक्त केले.

First published on: 22-10-2013 at 03:56 IST
TOPICSशरद राव
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad rao take u turn after bmc mayor declare bonus