जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्पना होती. म्हणून त्यांना जातिभेदाच्या भिंती समूळ नष्ट करायच्या होत्या. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. मात्र भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत आज समाजात जातिव्यवस्थेबाबत अधिक जाणिवा आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष जातीच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत, अशी खंत खासदार शशी थरूर यांनी ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’च्या चौथ्या दिवशी आयोजित एका सत्रात व्यक्त केली.

टाटा लिटरेचर लाइव्ह’मध्ये शनिवारी एका सत्रात खासदार शशी थरूर यांच्या ‘आंबेडकर अ लाइफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राघव बहल उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चर्चासत्र पार पडले. त्या वेळी शशी थरूर बोलत होते. सध्या सुरू असलेल्या जातीयवादाच्या राजकारणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘भारत जोडो’ आंदोलनात प्रत्येक राजकीय पक्ष सहभागी होत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने देशाच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांना याबद्दल आनंद झाला असता, असे थरूर यांनी एका प्रेक्षकाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या संकल्पांची गरज – नौशाद फोर्ब्स

भारत देश प्रगतिपथावर आहे. आपल्याला प्रगत होण्यासाठी लहान-मोठय़ा प्रत्येक व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे लागेल. नवनवीन संकल्पना मांडून त्यांची अंमलबजावणी करावी लागेल, असे मत फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी व्यक्त केले. उद्योजकांना आपला व्यवसाय अधिक नावीन्यपूर्ण कसा करता येईल या विषयावर प्रकाशझोत टाकण्यासाठी ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’मध्ये शनिवारी एका खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रास प्रमुख वक्ते म्हणून नौशाद फोर्ब्स आणि डॉ. पौर्णिमा डोरे सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.

भारताच्या वाढत्या सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र भारत हा चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत फार मागे असल्याची खंतही व्यक्त केली. पाश्चात्त्य आणि भारतातील उद्योजकांमध्ये काहीच फरक नाही. भारतातील अनेक उद्योजक तिथे कार्यरत आहेत. उद्योगवाढीसाठी आपण कशी क्लृप्ती लढवतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, असे मत व्यक्त करीत त्यांनी परदेशात यशस्वीपणे अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचा दाखला दिला.