मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर होत असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व दहा जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवासेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. मात्र स्थगितीपूर्वीच्या जुन्या नोंदणीप्रक्रियेच्या तुलनेत नवीन मतदार नोंदणी कमी झाली असून येत्या २२ सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित करावी आणि पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिंदे गटाच्या युवा सेनेने केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी स्थगितीपूर्वीच्या नोंदणीप्रक्रियेनुसार एकूण १ लाख १३ हजार २७१ पदवीधर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर अंतिम मतदारयादीनुसार ९४ हजार ६३१ पदवीधरांचे अर्ज पात्र आणि १८ हजार ६४० अर्ज अपात्र ठरले. मात्र त्यानंतर निवडणुकीला रातोरात स्थगिती, मतदारयादीवर आक्षेप, राजकीय आरोप - प्रत्यारोप आदी विविध कारणांमुळे नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक दिवसेंदिवस लांबणीवर पडली. हेही वाचा - वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोन जणांना आलीशान मोटरगाडीने चिरडले; एकाचा मृत्यू, एक जखमी निवडणूक स्थगितीचा मुद्दा न्यायालयातही पोहोचला. अखेर विद्यापीठाने अधिसभा निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करीत जुनी मतदारयादी रद्द केली आणि पदवीधरांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज भरावे लागले. मात्र, २६ हजार ९४४ पदवीधरांनीच नव्याने नोंदणी केली. नवीन अंतिम मतदारयादीनुसार १३ हजार ४०६ पदवीधरांचे मतदार अर्ज पात्र आणि १३ हजार ५३८ पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरले आहेत. परिणामी, १ लाख १३ हजार २७१ पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीनंतर नव्या नोंदणी प्रक्रियेत २६ हजार ९४४ पदवीधरांनीच भाग घेतला. जुन्या अंतिम मतदारयादीनुसार ९४ हजार ६३१ पदवीधरांचे मतदार अर्ज पात्र ठरले होते. मात्र, नवीन अंतिम मतदारयादीनुसार १३ हजार ४०६ पदवीधर मतदान करण्यास पात्र आहेत. या आकडेवारीत मोठी तफावत असून बहुसंख्य पदवीधर मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया राबवावी अशी मागणी एकही उमेदवारी अर्ज दाखल न केलेल्या शिंदे गटाच्या युवा सेनेकडून होत आहे. हेही वाचा - गोविंदांना विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन, २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार गरज पडल्यास न्यायालयातही धाव घेऊ नोंदणीकृत पदवीधर गटासाठीची जुनी अंतिम मतदारयादी आणि नवीन अंतिम मतदारयादीतील पदवीधर मतदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची शक्यता आहे. तसेच काही विशिष्ट गटांनीच नोंदणी केली का? त्यांचेच मतदार अर्ज पात्र ठरवले का? अशी शंका आहे. त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित करावी आणि नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया राबवावी, जेणेकरून सर्व पदवीधरांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले आहे. तसेच गरज पडल्यास न्यायालयातही धाव घेऊ, असे शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणी प्रमुख सल्लागार आणि माजी अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी सांगितले.