मुंबई: भाजपचे झारखंड मधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानावर शिवसेना शिंदे पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त केला. ‘अशी मस्ती आणि अशी वाक्य खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दुबे यांना दिला. पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दुबे यांच्या वकत्व्याचा निषेध व्यक्त करताना ‘दुबे यांना बिहार का सोडावे लागले, ते त्यांनी अगोदर सिध्द करावे’ असे सांगितले.
हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यानो, मुंबईतील ऊर्दु भाषिकांना मारुन दाखवा, घरात तर कुत्रा पण वाघ होतो. आता कुत्रा कोण ते ज्याने त्याने ठरवा. ‘मराराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपटून आपटून (पटक पटक के) मारु’ असे वादग्रस्त विधान झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी केल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटले. दुबे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दुबे यांना समज द्यावी, असे शिंदे पक्षाचे नेते संजय गायकवाड यांनी सांगितले.