मुंबई : आम्ही शिवसेना सोडल्याचा भ्रम पसरवला जात आहे. पण आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही मानतो. विधिमंडळ पक्षातील दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत असून निवडणुकीत भाजप-शिवसेना युती म्हणून लढल्याने राज्यात सरकारही युतीचेच असावे एवढीच आमची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्रात येणे सुरक्षित नाही म्हणून थांबलो असून लवकरच मुंबईत येऊ, असा दावा शिंदे गटाच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहटीत केला. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर शनिवारी प्रथमच शिंदे गटातर्फे गुवाहटीत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्यात आली. आम्ही शिवसेनेतच आहोत. आमचा विचारही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचाच विचार आहे. २०१९ मध्ये भाजपसह युती करून विधानसभा निवडणूक लढल्याने राज्य सरकारही भाजपसोबत युतीचे असावे अशी आमची भूमिका आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. आमच्यापैकी अनेकांनी वेळोवळी ही गोष्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली होती, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनात्मक तरतुदीनुसार शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही शिवसेना म्हणून काम करू शकतो. आम्हाला भाजपमध्ये विलीन होण्याची काहीच गरज नाही, असा दावाही केसरकर यांनी केला.