तूर्तास शांत राहण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका

शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि राममंदिर स्थानकाच्या उद्घाटनावरून आक्रमक झालेल्या भाजपपुढे तात्पुरते नमते घेत ‘तहाची’ भूमिका शिवसेनेने घेतली असून भाजपने आक्रमकपणे राजकीय खेळी केली तरी तूर्तास त्याला प्रत्युत्तर न देण्याचे ठरविले आहे. शिवस्मारक हा शिवसेनेच्याही जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याने या समारंभास आनंदाने हजर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासकीय कार्यक्रमाचा भाजपकडून राजकीय लाभ घेतला जात असल्याने शिवसेनेकडून त्याविरोधात नंतर आवाज उठविला जाणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र भाजप आक्रमक होत असून कुरघोडी करीत असल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

छत्रपती शिवरायांबद्दल आदर असल्याने भाजपने जरी राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, तरी किमान शनिवारचा दिवस शांत राहण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत ठाकरे यांच्याशी चर्चा करून सुसंवाद राखला आहे व त्यांना योग्य सन्मान देऊन आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जरी ठाकरे यांचे आक्षेप असले व त्यांनी टीका केली असली तरी ती सध्या बाजूला ठेवून स्मारक साकारले जात असल्याबद्दल ठाकरे हे मोदी व फडणवीस यांचे अभिनंदन करतील. मोदी यांच्यासमवेत ठाकरे यांना प्रत्येक ठिकाणी सन्मानाने आमंत्रित करण्यात आले असून ते मोदींसमवेत स्नेहभोजनही घेतील. मात्र स्वतंत्र चर्चेची शक्यता नसून हॉवरक्राफ्टमधील प्रवास व समारंभाच्या निमित्ताने मोदी व ठाकरे यांच्यात जुजबी चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे यांना न दुखावता गोड बोलून महापालिका निवडणुकीपर्यंत युतीच्या चर्चामध्ये झुलवीत ठेवण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची खेळी आहे.

राममंदिर स्थानकाच्या उद्घाटनात श्रेयवादावरून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुंपली व घोषणाबाजी झाली. शिवस्मारकाच्या भूमिपूजनानिमित्ताने भाजपने शासकीय कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन चालविले आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता असताना डावलले जात असल्याबद्दल नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेते, आमदार यांची बैठक घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काहीही केले, तरी शक्यतो त्यांना प्रत्युत्तर देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. भाजपचा आक्रमकपणा दिवसेंदिवस वाढत असला तरी सध्या थंड राहून ‘तह’ करावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे.