सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोनू साँगचा आधार घेत काही दिवसांपूर्वी आरजे मलिष्का हिने मुंबई महानगपालिकेच्या कारभारावर टीका केली होती. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची बिकट अवस्था आणि एकूणच पालिकेचा भ्रष्ट कारभार मलिष्काने या ‘सोनू साँग’च्या माध्यमातून विनोदी पद्धतीने मांडला होता. साहजिकच ही टीका शिवसेनेला चांगलीच झोंबली होती.

त्यानंतर शिवसेनेनेही मलिष्काला याच गाण्याच्या भाषेत उत्तर दिले आहे. पालिकेच्या राजकारणात आक्रमक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि काही शिवसैनिकांनी म्हटलेले हे ‘सोनू साँग’ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाण्याच्या माध्यमातून शिवसेनेने मलिष्काला एकप्रकारे गप्प राहण्याचा इशाराच दिला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘सोनू साँग’ची प्रचंड क्रेझ आहे. याच धर्तीवर  रेड एफएमची सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यावर उपहासात्मक मराठी गाणे तयार केले होते. या गाण्यातून मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे मजेशीर पद्धतीने वाभाडे काढण्यात आले होते.  ‘रेड एफएम’वर मुंबईच्या खड्डय़ांचा विषय दरवर्षी नेटाने लावून घेणाऱ्या ‘मुंबईची राणी’ आर. जे. मलिष्काने मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का..’ हे गाणे यूटय़ूबवर टाकले होते. हा व्हिडीओ मंगळवारी अपलोड झाल्यापासून अनेकांनी तो उचलून धरला आहे. जवळजवळ सगळ्याच रेडीओ चॅनल्सने आपले स्वतःचे सोनू व्हर्जन बनवले होते. पण त्यामध्ये मलिष्काचा व्हिडिओ सर्वाधिक गाजत आहे. मात्र, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला ही मस्करी फारशी रूचली नसल्याचे दिसून येते.