शिवसेनेने कितीही दबाव आणला तरी करारापेक्षा फारसे काहीही न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या क्षणी फारसे अधिकार नसलेले गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचे गुरुवारी रात्री उशिरा मान्य केले. त्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच असली तरी केसरकर, रवीद्र वायकर की अर्जुन खोतकर यांना ते मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असली तरी केसरकर यात बाजी मारण्याची चिन्हे आहेत.गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाल्याने हा कार्यभार शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना दिला जाईल.शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच अन्य काही मागण्या केल्या होत्या. पण अगदीच काही दिले नाही, असे होऊ नये, यासाठी गृहराज्यमंत्रीपद देण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. पण गृहराज्यमंत्र्यांना फारसे अधिकार नाहीत. सहाय्यक आयुक्त किंवा उपअधीक्षक व त्याहून अधिक वरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून केल्या जातात. गृहमंत्रीपदी आर.आर. पाटील असतानाही आपल्याला अधिकार नसल्याची आणि सर्व निर्णय मुख्यमंत्री घेत असल्याची त्यांची तक्रार होती. त्यामुळे आताही गृहराज्यमंत्रीपद दिले तरी हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने राज्यमंत्र्याला फारसे काही करण्याचे अधिकार नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.
राज्याच्या सत्तेतही वाटा द्या- आठवले
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आता राज्यातील सत्तेतही पक्षाला सहभागी करून घेऊन दुसरे आश्वासनही पूर्ण करावे, अशी गळ त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातली.शुक्रवारी सकाळी त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी सांताक्रूझ विमानतळावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आठवले यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.