पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या षण्मुखानंदमधील प्रस्तावित कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम येथे होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. गुलाम अलींचा शुक्रवारी षण्मुखानंदमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करा अन्यथा आंदोलन करून कार्यक्रम बंद पाडू असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेने दिला आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भातील निवदेन देखील शिवसेनेच्या चित्रपट सेनेने षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाला दिले आहे.

एका बाजूला पाकिस्तानने सीमेवर आगळीक करायची भारतीय सैनिकांनी शहीद व्हायचे आणि दुसऱया बाजूला तेथील कलाकारांनी येथे अर्थाजन करायचे हा परस्पर विरोधाभास असून हा देशाचा अपमान आहे. कलाकाराच्या कलेला आमचा विरोध नाही. पण काही खासगी आयोजक अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थाजन करीत असतील तर शिवसेनेचा त्यास कायम विरोध राहील, असे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पाकिस्तानच्या खेळाडू आणि कलाकारांना विरोध करत आहे. भारतीय नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱया पाकिस्तानशी सांस्कृतिक संबंध नको अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. याआधी शिवसेनेने पाकिस्तानी गायकांच्या टेलिव्हिजन रिआलिटी शोमधील सहभागावरून विरोध दर्शविला होता. तसेच पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंना मुंबईतील स्पर्धेतील सहभागी होण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई हॉकी असोसिएशनबाहेर निदर्शने केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.