‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव आखला जात असल्याची टीका करत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आपल्या मित्रपक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लक्ष्य करण्यात आले आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबईच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल बोर्ड’ निर्माण होईल व ही एकप्रकारे कॉर्पोरेट धर्तीची खासगी कंपनी असेल. म्हणजे मुंबई ही एकप्रकारे केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होईल, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुंबईला मागच्या दाराने केंद्रशासित करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याने शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार पाहून घ्यावी, मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे आणि मुंबईच्या १०५ हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारुन यावे म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल, असा सल्ला शिवसेनेने दिली आहे.
‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद, संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही, असा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे. मित्रपक्षानेच स्मार्ट सिटीच्या योजनेला लक्ष्य केल्यामुळे विरोधकांनाही आयत्या हाती कोलीत मिळाले आहे. त्यामुळे भाजपची नाचक्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव- शिवसेना
मुंबई ही एकप्रकारे केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होईल
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 14-12-2015 at 10:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena opposes smart city project for mumbai