मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेच्या (शिंदे) महिला आघाडीने इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक भेट दिले आहे. चतुर्वेदी यांचे शिक्षण मुंबईत झाले असले तरी त्यांना मराठीचा म देखील येत नाही. त्यामुळे यांनी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून मराठीचे धडे गिरवावेत आणि मराठी बोलायला शिकावे, अशी टीका शिवसेनेने (शिंदे) केली आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंना मराठी भाषेची आठवण झाल्याची टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची (शिंदे) कोंडी झाल्याची टीका सुरू झाली आहे. मात्र शिवसेनेने (शिंदे) ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर राज ठाकरेंना गोंजारायला सुरुवात केली आहे.

मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना इयत्ता पहिलीचे बालभारतीचे मराठी भाषेचे पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे. आधी आपल्या खासदार, आमदार आणि नेत्यांना मराठी शिकवावे आणि मग मराठीचा कैवार दाखवावे, अशी टीका शिवेसनेच्या (शिंदे) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

मराठी कच्चे, बोलताही येत नाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियंका चतुर्वेदी यांनी एका मुलाखतीत मराठी कच्चे आहे, बोलता येत नाही, असे म्हटले होते. त्यावरून म्हात्रे म्हणाल्या की, चतुर्वेदी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. ३० ते ३५ वर्ष मुंबईत राहून देखील त्यांना मराठी बोलता येत नाही का ? पाच वर्षांपासून खासदार असलेल्या चतुर्वेदींना मराठी शिकायला वेळ मिळाला नाही का ? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘म’ मराठीचा म्हणून मोर्चा काढणारे, ‘म’ महाराष्ट्राचा म्हणून बोलणारे शिवसेनेचे (ठाकरे) नेते चतुर्वेदी यांच्या कमकुवत मराठीवर कारवाई करण्याची धमक दाखवतील का, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे.