मुंबई : विधिमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधित्व कोण करणार यावरून शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा संघर्ष सुरू असतानाच, विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरून आता दोन्ही गट एकमेकांसमोर उभे आहेत. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या समिती सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून कोणाचेही नाव समाविष्ट करण्यात आलेले नसल्याने शिवसेनेने त्याला आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेवर नियंत्रण कोणाचे यावरून सुरू असलेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. त्या लढाईत शिंदे गटाला बळ देण्याच्या दृष्टीने राजकीय डावपेच रंगले आहेत. विधिमंडळाच्या कामकाजातही त्याचे प्रतिबिंब उमटले. विधानसभेत भाजप व शिंदे गटाच्या पाठिंब्याने निवडून आलेले राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्षपदी आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होत असल्याने कामकाज सल्लागार समितीवरील सर्वपक्षीय सदस्यांची यादी जाहीर झाली. त्यात विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या सदस्य यादीत शिवसेनेच्या एकाही सदस्याचा समावेश नाही. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व उदय सामंत यांची नावे त्यात आहेत. शिवसेनेने त्यास हरकत घेतली आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यपदी शिवसेनेतर्फे गटनेते अजय चौधरी व मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना घेण्यात यावे, असे पत्र विधानसभाध्यक्षांना देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अजय चौधरी यांनी हे पत्र दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेत मात्र शिवसेनेतर्फे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांना विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर सदस्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. विधान परिषदेत शिंदे गटाकडे कागदोपत्री कोणीच नसल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याचा प्रश्नच नाही.