मुंबई : ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.’च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला ठाकरे यांच्या पॅनेलमध्ये उमेदवारी देण्यात आल्यामुळे ‘बेस्ट’ आणि ठाकरे यांच्या शिवसेनेतही वातावरण तापले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी आधीच एकत्र येऊन तयार केलेल्या पॅनेलला आव्हान देण्यासाठी महायुतीनेही आपले पॅनेल उभे केले. परंतु ठाकरे पॅनलने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याने आश्चार्य व्यक्त होत आहे.
गेल्या किमान चार वर्षांपासून रखडलेल्या ‘बेस्ट’च्या पतपेढीची निवडणूक येत्या १८ ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीला महत्व आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येणार असून, दोन्हीकडील उमेदवारांचे एकच ‘उत्कर्ष पॅनेल’ या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहे.
महायुतीनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली. आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची ‘श्रमिक उत्कर्ष सभा’, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ‘समर्थ बेस्ट कामगार संघटना’ आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार किरण पावसकर यांची ‘राष्ट्रीय कर्मचारी सेना’ यांनी एकत्र येऊन ‘सहकार समृद्धी पॅनल’ची निर्मिती केली आहे. त्यातच आता बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार या शिवसेना (शिंदे) महिला पदाधिकाऱ्याला ठाकरे बंधूंच्या पॅनेलमध्ये प्रवेश दिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, याबाबत बबिता पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सदस्यांचा आक्षेप
बबिता पवार या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय आहेत. तसेच पक्षाच्या विधानसभा संघटकही आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे बेस्ट कामगार सेनेत नाराजीचे वातावरण आहे. परळच्या बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद असून त्यांनी बबिता पवार यांच्या नावाला विरोध केला आहे. परळच्या वसाहतीतील बेस्टच्या कामगारांनी सोमवारी शिवसेना भवन येथे जाऊन नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.
‘पक्षप्रवेश करवून घ्या’
बबिता पवार यांच्या उमेदवारीमुळे बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही संशय घेतला जात आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बबिता पवार यांचा पक्षप्रवेश करवून घेण्याचे आदेश दिले आहेत. पक्षप्रवेश करा किंवा २१ ऐवजी २० उमेदवारांनीच निवडणूक लढवा, असा आदेश ठाकरे यांनी दिला आहे. मात्र अद्याप या आदेशाचे पालन झालेले नाही.