मधु कांबळे
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्याच आमदाराने ऐनवेळी दगाफटका केल्याने हतबल झालेल्या काँग्रेसला शिवेसनेने साथ दिली. नागपूर शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेऊन व नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नसल्याने अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा देऊन भाजपविरोधातील महाविकास आघाडीच्या लढतीला शिवसेनेने बळ दिले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रसंगी आपल्या बंडखोर उमेदवारावर कारवाई करीत, नागपूरमधील काँग्रेसपुरस्कृत उमेदवाराचा लढतीचा मार्ग निर्धोक केला. महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.
विधान परिषदेच्या तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत झालेल्या जागावाटपात अमरावती शिक्षक मतदारसंघ व नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ या दोन जागा काँग्रेसला देण्यात आल्या होत्या. शिवसेनेला नागपूर शिक्षक मतदारसंघ सोडण्यात आला होता. परंतु काँग्रेसने ज्यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, ते आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अगदी शेवटच्या क्षणी अर्जच दाखल केला नाही, उलट मुलगा सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावून काँग्रेसची पंचाईत करून टाकली. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेसला अखेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सावरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये तांबे पिता-पुत्राचे बंड ही भाजपची खेळी असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळी तांबे पिता-पुत्राला धडा शिकविणे व भाजपला शह देणे, असे महाविकास आघाडीने डावपेच आखले. त्यासाठी रविवारी रात्री व आज सोमवारी दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात खलबते होऊन, अखेर नागपूर व नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडी म्हणून लढण्याची रणनीती ठरविण्यात आली. याच रणनीतीचा भाग म्हणून नागपूरची जागा काँग्रेसला सोडून नाशिकची जागा शिवसेनेने लाढवायची असे ठरले. त्यानुसार शिवसेनेने भाजपने डावललेल्या परंतु अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पाटील यांना काँग्रेसचे समर्थन घोषित केले. त्याचबरोबर शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांच्याविरोधात लढतील, असे त्यांनी जाहीर केले.शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीला काही वेगळी मते होती, परंतु शेवटी आघाडीचा उमेदवार म्हणून पाटील यांना समर्थन देण्यात आले.
काँग्रेससाठी शिवसेनेने नागपूर शिक्षक मतदारसंघातील आपल्या अधिकृत उमेदवार गंघाधर नाकाडे यांना माघार घ्यायला लावली. त्यांच्याऐवजी काँग्रेसने पाठिंबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यकर्ते सुधारकर अडबाले यांची उमेदवारी मान्य केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनीही अर्ज भरला होता, मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून काँग्रेसपुरस्कृत उमेदवाराचा लढतीचा मार्ग मोकळा केला.