आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत. त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांना पत्र लिहून भ्रष्टाचाराचा उल्लेख कऱणाऱ्या नितेश राणेंवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणे यांच्यावर टीका –

“नितेश राणे रात्री पत्र लिहितात का माहिती नाही. भ्रष्ट म्हणणाऱ्या सर्वांना तुम्ही मांडीवर घेतलं आहे, त्यांचं आधी काय करणार ते सांगा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवलं असतानाही तेच मुंबई महापालिका जिंकतील. कारण तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार, नंतर आता ज्या पक्षात आहात त्यांच्यासाठी गळे काढत आहात. त्यांच्याकडे इतकं लक्ष देण्याची गरज नाही. नितेश राणे आपल्या वडिलांचं ऐकत नाही, दुसऱ्यांचं काय ऐकणार?,” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

“ठाकरे कुटुंबाला टार्गेट करण्यामागे वेगळे हात, दिल्लीमधील टाळकी सगळं काही आहे. आम्ही नियतीवरही विश्वास ठेवणारे आहेत. हा संत भूमींचा महाराष्ट्र आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळवायचा होता, डोकी फोडायची होती ते आदित्य आणि उद्धव ठाकरे होऊ देणार नाही. त्यामुळेच आदित्य ठाकरेंना नामोहरम करणं हा एकमेव अजेंडा आहे,” असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

नितेश राणेंचं मुंबई पालिका आयुक्तांना पत्र; म्हणाले “आदित्यसेना टक्केवारी गँगमुळे…”

“मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. २५ मधील २० वर्ष ते आमच्यासोबतच होते याचंही उत्तरादायित्व घ्या. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार का काढला नाही? स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो असं म्हणतात, मग यशवंत जाधवांना सोबत का घेतलं?,” अशी विचारणा किशोरी पेडणेकर यांनी केली. मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भरत गोगावले तुम्हाला आठ माळ्यावरच्या मातोश्रीवर कोणी बोलावलं नाही आणि तुम्ही येऊही नका असा संताप किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

“भाजपामध्ये जे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलं आहे. आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत, त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena kishori pednekar on bjp nitesh rane aditya thackeray sgy
First published on: 26-08-2022 at 16:29 IST