scorecardresearch

“मुंबई केंद्रशासित करण्यासाठी मोठं षडयंत्र; सोमय्यांकडून गृहमंत्रालयाला सादरीकरण”; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “किरीट सोमय्या खोटे कागद घेऊन नेहमी दिल्लीत जात असतात. किरीट सोमय्या आणि त्यांच्या लोकांचं मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात मोठं षडयंत्र सुरु आहे. या लोकांनी गृहमंत्रालयाला सादरीकरण दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत”.

“मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं सादरीकरण भाजपाच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केलं आहे. या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे आहे. काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

“मुंबईच्या शाळात मराठीसक्ती असू नये यासाठी किरीट सोमय्या कोर्टात गेले होते. तेव्हापासून त्यांचं हे सुरु आहे. आता केंद्रात भाजपाचं सरकार आल्याने या महाराष्ट्रद्वेष्टांना बळ मिळालं आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा गौप्यस्फोट नाही, सत्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून माझं लक्ष आहे. हे सादरीकरण कुठे करत आहेत, मुंबईतून कोण मदत करत आहे, भाजपाचा सर्वात मोठा फायनान्सर असणारा हा बिल्डर कोण आहे याकडे माझं लक्ष आहे. मी यावेळी नाव घेत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा होत आहे. काही दिवसात मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होत असल्याचा विषय घेऊन हे कोर्टात जाऊ शकतात. याशिवाय इतरी मुद्दे घेऊन त्याच्यामुळे मुंबई स्वतंत्र करावी यासाठी सादरीकरण सुरु असून, बैठका होत आहे. पैसे गोळा केले जात असून हे मी फार गांभीर्याने बोलत आहे”.

आधी मुंबई, महाराष्ट्राला बदनाम केलं जाणार आहे, हे षडयंत्र महाराष्ट्रासाठी मोठा धोका असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे असं संजय राऊतांनी सांगितलं. मी काही पेन ड्राईव्ह वैगेरे घेऊन फिरत नाही. मी बोलतोय ते सत्य आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

“भाजपाचं मुंबईला केंद्रशासित करण्याचं जे कारस्थान आहे त्याचे सूत्रधार किरीट सोमय्या आहेत. याशिवाय आणखी दोन महत्वाचे अमराठी लफंगे आहेत त्यातील एक वाराणसीचा आहे आणि एक मोठा बिल्डर आहे जो भाजपाचा फायनान्सर आहे. ते सातत्याने दिल्लीत जाऊन मुंबईवर शिवसेनेचं, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये यासाठी गृहमंत्रालयाला सादरीकरण दिलं आहे,” असा दावा संजय राऊतांनी केला.

“परवा राज्यसभेत अमित शाह यांना एक प्रश्न विचारला की, केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का? आणि त्यांचा गैरवापर होत नाही हे डोळ्यात डोळे घालून सांगा म्हटलं. त्यावर त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगण्यास तयार असल्याचं म्हटलं. तेव्हाही मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला. रश्मी शुक्ला कोणाच्या इशाऱ्याय़ावर काम करत होत्या हे सर्वांना माहिती आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे आमचे फोन टॅपिंग करुन दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हे सरकार जे आम्ही बनवत होतो त्या काळातील या घडामोडी आहेत. हा आमच्या सर्वांच्या सुरक्षेचा विषय होता. जबाब नोंदवणार असतील तर त्यांच्यासमोर जाण्यास माझी तयारी आहे,” असं संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना सांगितलं.

“आजच मुलुंडचे महात्मा ५८ कोटींचा हिशोब द्या सांगत होते. तुम्ही हिशोब दिला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे….तुम्ही नाही कोटींचं सांगता तेव्हा ते हिशोब कुठून आणता. विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले की नाही हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही सतत १० दिवस पैसे गोळा करत होतात. ७११ खोके भरले आणि त्याचा व्हाईट पैसा कसा केला हे माहिती आहे. नौटंकी बंद करा. मोठ्याने बोललं की ते खरं खोटं होत नाही. पुरावा असून गुन्हा दाखल झाला आहे. सेव्ह विक्रांतच्या नावे पैसे गोळा केले की नाही हा इतकाच प्रश्न आहे. किती केलेत हे पोलीस तपासात सिद्ध होईल. मला विचारलं तर माझा आकडा देईन. तुम्ही पैसे गोळा करुन पचवून ढेकर दिले आहेत. त्याचा दुर्गंध मुंबईत येत आहे. त्या पैशांचा कुठे वापर केला याची सर्ल माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही महाराष्ट्राला, देशाला फसवत आहात,” असं संजय राऊत म्हणाले.

“जर भाजपाचे प्रमुख लोक या गैरव्यवहाराचं समर्थन करणार असतील तर त्यांची काश्मीर फाईलप्रमाणे वेगळी फाईल तयार करावी लागेल. ही विक्रांत फाईल आहे. देशद्रोह्याचं समर्थन करु नका, किरीट सोमय्याचं प्रकरण अफजल गुरु आणि कसाबइतकं गंभीर आहे. देशाच्या सुरक्षव्यवस्थेशी खेळलेला हा माणूस आहे. मोठ्याने बोलतो, नौटंकी करतो. इकडचं तिकडचं बोलू नका फक्त प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्या,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

आणखी १० प्रकरणं समोर आणणार असल्याचा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी केला पाहिजे, पण ते करणार नाही. आज तो चोर दिल्लीत गेला आहे. दिल्लीत नौटंकी करण्यासाठी गेले आहेत पण त्यांचं वस्त्रहरण झालं आहे असंही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut claimed kirit somaiya and some bjp leaders trying to divide mumbai from maharashtra sgy

ताज्या बातम्या