महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आंदोलनाचे आदेश दिले. यानंतर ठिकाठिकाणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडल्या. याच मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला लक्ष्य केलं. त्यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) ट्वीट करत मनसेच्या तोडफोडीवर टीका केली.

दीपाली सय्यद म्हणाल्या, “मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी. राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे. दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन आणि बाहेर स्टंटबाजी करून पण देशाचे नुकसान.”

हेही वाचा : मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचे कार्यालय फोडले; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक

“युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा”

“युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी अमित ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

राजापूर तालुक्यातील महामार्गावरील टोलनाक्यावर तोडफोड

मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका काहीजणांनी अचानक हल्ला करून फोडण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने घोषणा देत हातिवले येथील टोलनाक्याकडे अनपेक्षितपणे मोर्चा वळवला आणि तेथील केबीनची  मोडतोड केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी राजापूर पोलिसांनी सायंकाळी उशिरा दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत बोलताना या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल नापसंती व्यक्त करत संबंधितांना जरब बसेल, अशी कृती करण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.