शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. त्यामुळे देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उद्या शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) येतात. त्यामुळे शिवतीर्थावर चोख बंदोबस्त ठेवावा लागतो, तसेच शिवसैनिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागतात. या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थावर येऊन गेले. त्यापाठोपाठ शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले.

शिवतीर्थावर पोहोचल्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं. शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली. शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढू लागल्याने अखेर मुंबई पोलिसांचं एक पथक शिवतीर्थावर दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परबदेखील शिवतीर्थावर दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रेदेखील घटनास्थळी दाखल झाल्या. म्हात्रे यांनी आरोप केला आहे की, “ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आधी घोषणा दिल्या. तसेच त्यांनी धक्काबुक्कीदेखील केली.” यावेळी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्यादेखील शिवतीर्थावर जमल्याचं पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> खारघर दुर्घटनेचा अहवाल आठ महिन्यांनंतरही गुलदस्त्यात! महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १४ मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. परंतु, ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या नेत्यांना पाहून ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देतच राहिले. अनिल देसाई यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी देसाई म्हणाले, “आमच्यासाठी उद्याचा दिवस खूप खास आहे. आम्ही शांततेनं इथे जमलो होतो. आम्हाला श्रद्धांजली वाहायची आहे. काही लोक इथे तमाशा करण्यासाठी येत आहेत. परंतु, कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, अनर्थ घडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तसं होऊ देणार नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत”.