दिल्लीत केंद्रीय पोलिसांनी ‘न्यूज क्लिक’ या माध्यम संस्थेशी संबंधित पत्रकारांवर धाडी टाकल्या. तसेच न्यूज क्लिकचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक केली. यानंतर देशभरातून मोदी सरकारवर सडकून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही केंद्रीय तपास यंत्रणा मोदी सरकारच्या गुलाम असल्याचं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये गुरुवारी (५ ऑक्टोबर) ठाकरे गटाने ही टीका केली.

ठाकरे गटाने म्हटलं, “सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करावा ही काही लोकशाही नाही. केंद्र सरकारने पत्रकारांवरील कारवाईचे समर्थन केले. तसे असेल तर भाजपाने आणीबाणीचा निषेध करणे सोडले पाहिजे. तपास यंत्रणा स्वायत्त आणि स्वतंत्र असून आपले कायदेशीर कर्तव्य बजावीत आहेत, असे केंद्रीय प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर म्हणतात. तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम हे संपूर्ण देश जाणतोय. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे की, निष्पक्ष रहा, सूडाने कारवाया करू नका. यातच सर्व आले. पत्रकारांवरील धाडी व कारवाया हे यंत्रणा निष्पक्ष असल्याचे लक्षण नसून सरकार घाबरले असल्याचे लक्षण आहे.”

“दहशतवाद्यांप्रमाणे पत्रकारांच्या घरांवर कारवाया”

“पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपाविरुद्ध बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली येथे धाडी पडल्या. ‘न्यूज क्लिक’ या वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना तर अटक केली गेली. चीनधार्जिणा दुप्रचार चालविण्यासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर असून ‘यूएपीए’ म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून या धाडी सुरू झाल्या. दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करावे तशा पद्धतीने पोलिसांची पथके पत्रकारांच्या घरात घुसली. लेखिका गीता हरिहरन, अभिसार शर्मा, भाषा सिंह, उर्मिलेश, अनिंदो चक्रवर्ती, इतिहासकार सोहेल हाशमी, व्यंगचित्रकार संजय राजौरा, इरफान खान, स्तंभलेखिका अनुराधा रमन, सत्यम तिवारी अशा अनेक पत्रकारांवर छापे टाकून त्यांचे फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले,” असं ठाकरे गटाने म्हटलं.

“आता सरकारविरुद्ध लिहिणे-बोलणे हा देशद्रोह, दहशतवादासारखा गुन्हा”

“कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या घरीही पोलीस पोहोचले. येचुरी यांचे स्वीय सहाय्यक नारायणन यांचे चिरंजीव सुमित ‘न्यूज क्लिक’मध्ये कामाला आहेत. त्यामुळे येचुरी यांच्या घरावर छापे पडले. आणीबाणीत व्यक्तिस्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाली, असे बोंबलणाऱ्यांच्या राज्यात वृत्तपत्र स्वातंत्र्य वधस्तंभावर चढवले असेच म्हणावे लागेल. आणीबाणीत सेन्सॉरशिप होती. आता सरकारविरुद्ध लिहिणे-बोलणे हा देशद्रोह, दहशतवादासारखा गुन्हा ठरला आहे. देशातील सर्व माध्यमांचा ताबा भाजपापुरस्कृत उद्योगपतींनी घेतला आहे. त्यामुळे सर्व एकतर्फी पद्धतीने सुरू आहे. चार दिवसांपूर्वी मोदी सरकारविरोधात दिल्ली व आसपासच्या प्रदेशांतून लाखोंच्या संख्येने लोक जमले. रामलीला मैदानावर जनसागर उसळला, पण या जनसागराचे म्हणणे काय? ते काही भाजपाची चमचेगिरी करणाऱ्या मीडियाने दाखवले नाही. अशा ‘गोदी’ मीडियाला समांतर असा बाणेदार मीडिया समाजमाध्यमातून उभा राहिला. त्यास लोकांनी पाठिंबा दिला तेव्हा सरकारला मिरच्या झोंबल्या,” अशी टीका ठाकरे गटाने केली.

“वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ले करायचे हे चांगले लक्षण नाही”

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “सरकार इतके घाबरले की, त्यांनी अशा पत्रकारांवर धाडी घातल्या. ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये भारत जागतिक यादीत शेवटून विसाव्या क्रमांकावर घसरला आहे. कालच्या धाडसत्रानंतर देश आणखी खाली घसरेल. भारत जगातील लोकशाहीची जननी आहे, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ले करायचे हे चांगले लक्षण नाही. ज्यांच्यावर धाडी घातल्या त्या पत्रकारांवर आरोप आहे की, चीनधार्जिण्या प्रचारासाठी या लोकांनी पैसे घेतले. असे कोण म्हणते? ‘न्यूज क्लिक’ला अमेरिकन अब्जाधीश कादंबरीकार रॉय सिंघम यांनी आर्थिक पाठबळ दिले असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ५ ऑगस्टला प्रसिद्ध केले. चिनी प्रचाराला चालना देण्यासाठी भारतासह जगभरातील संस्थांना हे सिंघम निधी देतात असे त्या बातमीत म्हटले हाच धाडीमागचा आधार.”

हेही वाचा : “हे माणुसकीशून्य सरकारने रुग्णांचे पाडलेले खूनच, त्यामुळे…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदी सरकारच्या ‘पार्टनर’ उद्योगपतीचा पर्दाफाश केला तेव्हा…”

“चीन अर्थपुरवठा करतोय असे अमेरिकेच्या वृत्तपत्राने म्हटले, पण अमेरिकेच्या वृत्तपत्राने भारताची अर्थव्यवस्था हादरवणारा एक ‘हिंडेनबर्ग’ रिपोर्ट छापला आणि मोदी सरकारच्या ‘पार्टनर’ उद्योगपतीचा पर्दाफाश केला तेव्हा दिल्ली पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणांनी अशा धाडी घालून देशहिताचा डंका वाजवला नव्हता. चीनविषयी सरकारला संताप आहे हे मान्य केले, तर पीएम केअर फंडात काही चिनी कंपन्यांनी भरीव योगदान दिल्याचा आरोप आहे. दुसरे म्हणजे लडाखच्या भूमीत चीन बराच आत घुसला आहे. अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा सांगितला आहे. मणिपूरच्या हिंसाचारात चीनचा हात आहे. येथे रॉय सिंघमचा संबंध नाही. भारतात घुसलेल्या चीनला हात लावता येत नाही व पत्रकारांवर धाडी घालून सरकार भलतीच ‘सिंघमगिरी’ दाखवू पाहत आहे,” अशी टीका ठाकरे गटाने केली.