एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं याचा पुनरुच्चार केला. तसंच आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसेल असा टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आरे कारशेडचा मुद्दाही उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचं ठरलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मामाने झालं असतं. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केलं?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्विकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला

पुढे ते म्हणाले की, “शिवसेना तुमच्यासोबत अधिकृतपणे सोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मग मला कशाला मधे मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं. तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता”.

पाहा व्हिडीओ –

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग…”, उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन!

“जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“अमित शाह यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आलं असतं. अडीच वर्ष झाली आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. मी तर तेव्हाही सांगितलं होतं की, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर एक पत्र तयार करुन त्यावर मुख्यमंत्र्याची सही, पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल असा मजकूर लिहिला असता. हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करुन लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता असंही सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचं दु:ख झालं आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे. यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“गेल्या ८-१० दिवसात मला अनेकांचे मेसेज आहे. सोशल मीडियावरुन अनेकांच्या भावना कळाल्या. त्याबद्दल मी ऋणी आहे. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असं क्वचित होतं. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही,” असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.

“अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही,” असंही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray on eknath shinde being maharashtra cm devendra fadanvis sgy
First published on: 01-07-2022 at 14:19 IST