राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर कुटुंबाला झालेला त्रास याची आठवण करुन देताना, त्यांच्या कारकिर्दीचं कौतुकही केलं. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन मिश्कील टोलाही लगावला.

“नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. पण आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे गटाला लक्ष्य केलं. पुढे ते म्हणाले “चार महिने अधिक मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. पण मी त्यात थोडी सुधारणा करु इच्छितो. जर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर त्याच्या आधीच ते मुख्यमंत्री झाले असते”. उद्धव ठाकरेंचं हे विधान ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“सरकार वाचवण्यात ते किती हुशार आहेत हे आत्ता तुम्ही मला सांगत आहात, तेव्हाच सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावलं असतं,” असंही उद्धव ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले.

‘भुजबळांनी शिवसेना सोडली तो मोठा धक्का’

“आता आम्ही धक्काप्रूफ झालो आहोत. पण भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा आमच्या कुटुंबाला सर्वात पहिला मानसिक धक्का बसला होता. बाळासाहेब, माँ आणि आम्हालाही बसला होता. आपल्या कुटुंबातील माणूस सोडूनच कसा जाऊ शकतो हाच मोठा धक्का होता. राग वैगेरे हा तर राजकारणाचा भाग झाला, पण आपला माणूस जाणं मोठा धक्का होता. त्यातून मानसिकदृष्ट्या सावरताना आम्हाला वेळ लागला,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले “बाळासाहेब असतानाच तुम्ही हे सर्व मिटवून टाकलंत हे चांगलं केलं. घरी आल्यावर बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. सर्व मतभेद तुम्ही मिटवून टाकलेत. फक्त त्यावेळी माँ हव्या होत्या”.