जानेवारी सत्रासाठी अवघे साडेसहाशे अर्ज
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरशिक्षण संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत अवघ्या साडेसहाशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जुलै सत्रात ६७ हजार विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये प्रवेश निश्चित केला होता.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जुलै आणि जानेवारीच्या सत्रासाठी मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत आयडॉलची प्रवेश प्रक्रिया वर्षांतून एकदाच करण्यात येत होती. मात्र देशभरातील दूरशिक्षण संस्थांना दोन सत्रांत प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मुभा आयोगाने दिली आहे. त्यानुसार आयडॉलमध्ये जानेवारीचे सत्रही यंदा सुरू करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना जुलैच्या सत्रासाठी प्रवेश घेता आला नाही, त्याचप्रमाणे पुनर्मूल्यांकनात किंवा डिसेंबरमधील सत्रात पुनर्परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाचेल या उद्देशाने हे दुसरे सत्र सुरू करण्यात आले.
मात्र, या सत्राला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. आयडॉलच्या जानेवारीच्या सत्रात आतापर्यंत ६५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यापूर्वी जुलैमधील सत्रात ६७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता विद्यापीठाने प्रवेश घेण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. प्रथम वर्ष बीए, प्रथम वर्ष बी.कॉम., पदव्युत्तर प्रथम वर्ष एम. ए.(मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र), प्रथम वर्ष एम. ए. (शिक्षणशास्त्र) व प्रथम वर्ष एम. कॉम. या अभ्यासक्रमांना आयडॉलमध्ये प्रवेश घेता येईल.
जानेवारी सत्रात झालेले प्रवेश
- प्रथम वर्ष बीए : १३१
- प्रथम वर्ष बीकॉम : १०४
- प्रथम वर्ष एमए : १७२
- प्रथम वर्ष एमए-
- शिक्षणशास्त्र : १६
- प्रथम वर्ष एम. कॉम.: २२८
प्रवेशासाठी मुदतवाढ
आयडॉलच्या जानेवारी सत्राचे प्रवेश २१ जानेवारीपासून सुरू झाले. सुरुवातीला प्रवेश निश्चित करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता विद्यापीठाने प्रवेश घेण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.