अक्षय मांडवकर

पार्किंगची जबाबदारी ‘एमएमआरडीए’वर

वाहनतळांच्या क्षेत्रातील खासगी कंत्राटदारांच्या मक्तेदारीला आळा घालून वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) आता आपल्या खांद्यावर घेणार आहे. यासाठी ‘बीकेसी ट्रॅफिक पोलीस युनिट’ची स्थापना करण्यात येणार असून वाहतूक शिस्तीसाठी या परिसरातील रस्ते एकमार्गी करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे.

बीकेसी परिसरात असणाऱ्या कार्यालयांची संख्या लक्षात घेता या परिसरातून दररोज दोन लाख प्रवासी आणि २० हजार वाहने प्रवास करतात. बीकेसीमध्ये येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगच्या नियोजनाची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे आहे. मात्र या कंत्रादारांकडून नियम धाब्यावर बसवले जातात. एमएमआरडीए  कार्यालयाच्या परिसरामध्येच हे कंत्राटदार एका रस्त्यावर वाहनांच्या दोन-तीन रांगा लावून रस्ता अडवतात.

शिवाय रिक्षा चालकही एकमार्गी रस्त्यावर बिनदिक्कत रिक्षा हाकतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी एमएमआरडीएकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

बीकेसी परिसरात भविष्यात मोठे वाहतूक प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्थानकाचा समावेश आहे. शिवाय मेट्रो-३ आणि मेट्रो-२ (ब) या मार्गिकांची स्थानकेदेखील याच परिसरात असणार आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत या परिसरामध्ये वाहतूक वाढणार असून वाहनांच्या पार्किंगसाठी अतिरिक्त जागेची आवश्यकताही भासणार आहे.

त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी स्वत:च्या खाद्यांवर घेण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. ‘स्मार्ट पार्किंग’च्या अंतर्गत सर्वप्रथम पदपथ आणि जुने झालेले वाहतुकीचे चिन्हफलक ‘एमएमआरडीए’कडून बदलण्यात येतील.

तसेच वाहनांच्या पार्किंगमधील खासगी कंत्राटदारांच्या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी त्यांना हटविण्यात येणार आहे. त्याऐवजी ‘बीकेसी ट्रॅफिक पोलीस युनिट’ची स्थापना करून त्यांच्यामार्फत पार्किंगचे नियोजन करण्यात येईल.

तसेच वाहनचालक आणि रिक्षाचालकांच्या मुजोरील चाप बसविण्यासाठी अंतर्गत भागांतील काही रस्ते एकमार्गी करण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बीकेसी ट्रॅफिक पोलीस युनिट’साठी तीन ते चार वाहने दिली जातील. प्रत्येक गाडीत वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस आणि एमएमआरडी कर्मचारी असेल. शिवाय एक अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे.  – आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए