प्रसाद रावकर

मनोबल खचलेल्या करोना रुग्णांकडून संपर्कातील लोकांची माहिती मिळवणे आणि विलगीकरणासाठी संशयितांचे मन वळवण्याचे आव्हान पेलल्यामुळे मुंबई पालिकेला १५ लाख ४९ हजार व्यक्तींचे विलगीकरण शक्य झाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण केल्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.

करोना रुग्ण सापडल्यानंतर पालिकेचे आरोग्य कर्मचारी त्याच्याशी संपर्क साधतात. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येते. रुग्ण आणि त्याच्या संपर्कातील संशयितांकडून माहिती काढण्याचे आणि त्यांचे मन वळवण्याचे कौशल्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागते. अनेकदा संशयित रुग्ण विलगीकरणात जावे लागेल म्हणून सहकार्य करीत नाहीत किंवा पळ काढतात. पण अशा प्रकारच्या अडचणींवर मात करत पालिका कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या संपर्कातील लाखो संशयितांचा शोध घेतला.

आतापर्यंत १५ लाख ४९ हजार ७८६ जणांचा शोध घेतला. यापैकी पाच लाख १९ हजार २०४ जण अतिजोखमीच्या गटात, तर १० लाख ३० हजार ५८२ जणांचा कमी जोखमीच्या गटात समावेश होता. १२ लाख ९० हजार ५४२ जणांनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे. १२ हजार ३७४ संशयित ‘करोना शुश्रूषा केंद्र-१’मध्ये दाखल आहेत. दोन लाख ४६ हजार ८७० संशयितांना घरातच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. घरात विलगीकरणात राहून उपचार कसे घ्यायचे, याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत ३२७ ‘करोना शुश्रूषा केंद्र-१’ उभारण्यात आली असून तेथे ५०,४९३ खाटांची व्यवस्था आहे. शुश्रूषा केंद्र-१मध्ये १२ हजार ३७४ संशयित दाखल आहेत. २४ हजार २१९ खाटांची क्षमता असलेल्या १७२ ‘करोना शुश्रूषा केंद्र-२’पैकी सहा हजार १६० खाटांच्या क्षमतेची ५७ केंद्रे कार्यान्वित असून तेथे दोन हजार ७३६ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत ‘करोना शुश्रूषा केंद्र-१’ आणि ‘करोना शुश्रूषा केंद्र-२’ मध्ये अनुक्रमे एक लाख १७ हजार ०४९ आणि २४ हजार ७०४ करोना संशयितांना दाखल करण्यात आले होते. विलगीकरण मुदत संपल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मन वळवण्याचे आव्हान पेलताना..

करोनाची बाधा झाल्याचे समजताच रुग्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. पण त्याच वेळी विषाणू फैलाव रोखण्याचे आव्हान पालिका कर्मचाऱ्यांसमोर असते. हे कर्मचारी मानसिकदृष्टय़ा खचलेल्या रुग्णाकडून संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती खुबीने काढून घेतात. संपर्कातील व्यक्ती घरातील असल्या तर फारशी अडचण नसते, परंतु बाहेरील असेल तर दूरध्वनी, पत्ता शोधून त्याच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. विलगीकरणात पाठवले जाईल, या भीतीने अनेक जण माहिती देण्यासही तयार होत नाहीत. पण त्यांचे मन वळवण्याचे अवघड कामही कर्मचाऱ्यांना करावे लागते. या कामाची जबाबदारी पालिका विभाग कार्यालयांतील आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांवर आहे.

अतिजोखमीच्या गटातील करोना संशयितांना विलगीकरणात ठेवल्याने संसर्गाचा धोका काही अंशी कमी झाला. त्याचबरोबर धारावीसारख्या भागात घराघरांत तपासणी, खासगी डॉक्टरांची मदत आदी उपाययोजनांचाही फायदा झाला.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका