२५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत शाळा प्रवेशास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९’अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित कोट्यातून दरवर्षी मोफत प्रवेश देण्यात येतो. याअंतर्गत २०२३-२४ या नव्या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई जिल्ह्यातील एकूण ३३७ पात्र शाळांमध्ये सहा हजार ५६९ जागा उपलब्ध आहेत. पालकांना १७ मार्चपर्यंत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या संकेतस्थळावरील ‘विद्यार्थी’ या पर्यायाअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या ‘आरटीई’ संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

हेही वाचा >>>मानखुर्दमध्ये बोगस डॉक्टर अटकेत

आरटीई अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण मुंबईत ८३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या मदत केंद्राची यादी पालकांना संबंधित संकेतस्थळावरील ‘हेल्प डेस्क’ या पर्यायामध्ये ‘मुंबई बीएमसी’ हा जिल्हा निवडून पाहता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी आरटीई २५ टक्क्यांअंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरून, पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुलुंडमधील १७ अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेचा हातोडा

जे पालक स्वतः मोबाइलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी आणि प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी, संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six thousand 569 seats in private schools under the right to education act mumbai print news amy
First published on: 04-03-2023 at 23:17 IST