‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी आता तंत्रज्ञानाच्या बाबतीतही प्रगत होत चालली आहे. आतापर्यंत ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या तिकिटाची छापील प्रत बाळगणे आवश्यक होते. मात्र एसटीने आपल्या या धोरणात बदल करत ऑनलाइन आरक्षण केल्यानंतर प्राप्त होणारा एसएमएसही प्रवासादरम्यान तिकीट म्हणून लवकरच ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीने ‘पेपरलेस’ कारभाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
एसटीच्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट आरक्षण केल्यानंतर त्या तिकिटाची छापील प्रत जवळ बाळगणे किंवा ते ई-तिकीट आपल्या लॅपटॉप अथवा मोबाइलवर दाखवणे आवश्यक होते. मात्र ऑनलाइन आरक्षण केल्यानंतर ई-तिकिटाची छापील प्रत काढणे सर्वानाच शक्य नव्हते. छापील प्रत दाखवण्याऐवजी ऑनलाइन आरक्षणावर शिक्कामोर्तब करणारा मोबाइलमधील एसएमएस दाखवण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना ‘शिवनेरी’ने नेहमीच प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी एसटीला वेळोवेळी केली होती. रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण केल्यानंतर येणारा एसएमएस रेल्वे प्रवासादरम्यान ग्राह्य मानला जातो. मग हाच न्याय एसटीच्या तिकिटांबाबत का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.एसटीने या सर्व सूचनांचा विचार करून अशा प्रकारे ऑनलाइन आरक्षण केल्यानंतर येणारा एसएमएस प्रवासादरम्यान ग्राह्य धरला जाईल, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरच अमलात येईल, असे स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
आरक्षणाचा एसएमएस मिळवा, एसटीत बसा!
प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी आता तंत्रज्ञानाच्या बाबतीतही प्रगत होत चालली आहे. आतापर्यंत ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या तिकिटाची छापील प्रत बाळगणे आवश्यक होते.
First published on: 12-11-2014 at 12:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sms service for st bus reservation