भारतात मोठय़ा प्रमाणात पाठविण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा शेजारील देशातील (पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही) चलनी नोटांशी मिळत्याजुळत्या असून, भारताची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा हा प्रकार दहशतवादी कृत्यच असल्याचे एनआयएच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने मान्य केले आहे. २००९ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना दोषी ठरविण्यात आले असून, गुरुवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे. बनावट नोटा तस्करी प्रकरणात पहिल्यांदाच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ‘एनआयए’कडून तपास करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण असून बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपींना दोषी ठरविण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे.
विशेष ‘एनआयए’ न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल शेख, मोहम्मद ऐझुल, रवी धीरेन, गोश नुरुद्दीन बारी, मोहम्मद समद आणि ऐझुल शेख अशा सहा जणांना बनावट चलन बाळगल्याप्रकरणी भारतीय दंड विधान, बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा आदींतर्गत दोषी धरले. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातील खटले, देशाविरुद्धचे गुन्हे आदींच्या चौकशीसाठी ‘एनआयए’ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ‘एनआयए’कडून तपास करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे. माझगाव परिसरात बनावट नोटांचा साठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या दहशतवादी पथकाने (एटीएस) १४ मे २००९ रोजी माझगाव येथील स्टार सिनेमाजवळून आरोपींना अटक केली होती. एक हजार रुपयांच्या ७५ बनावट नोटा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या होत्या.
सुरुवातीला एटीएसकडून प्रकरणाचा तपास करण्यात आल्यावर १९ जून २००९ रोजी ‘एनआयए’ने तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ६ नोव्हेंबर २००९ रोजी आरोपींवर एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात बनावट चलनाच्या या तस्करीचा म्होरक्या म्हणून शौकत नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता आणि तो पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचा आर्थिक डोलारा डळमळीत करण्याच्या उद्देशाने बनावट चलनाची तस्करी करण्याची दहशतवादी संघटनांची ही योजना असल्याचा आरोपही आरोपपत्रात करण्यात आला होता. याशिवाय तीन आरोपी फरारी दाखविण्यात आले होते. आरोप सिद्ध करण्यासाठी ‘एनआयए’ने सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले, अशी माहिती विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी दिली. या प्रकरणी ‘एनआयए’तर्फे ३९ साक्षीदार तपासण्यात आले.

‘एनआयए’चा तपास
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या पथकाने मुंबईत बनावट चलनाच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणात तपास करून आरोपपत्रही दाखल करण्यात आले, मात्र हा तपास एनआयएने हाती घेऊन देशभरात विविध ठिकाणी सापडलेल्या बनावट चलनाची तपासणी करण्याचे ठरविले. बंगळुरू येथील तज्ज्ञांकडून या प्रकरणी अहवाल घेतला. इतकेच नव्हे तर शेजारच्या देशातील चलनी नोटांशी काय साम्य आहे, याचाही अहवाल मागविला होता. या प्रकरणी मिळालेल्या दोन्ही अहवालांत बनावट चलनी नोटा, त्यासाठी वापरलेला कागद, त्याचा दर्जा, रासायनिक वैशिष्टय़े, इतकेच नव्हे तर त्याचे वजन आणि छपाई हीदेखील मिळतीजुळती असल्याचे नमूद केले होते. हा अहवाल स्वीकारीत न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरविले.