मुंबई : भारतातील पहिले महिला विद्यापीठ अशी ओळख असलेल्या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’चा (एसएनडीटी) ७५ वा दीक्षान्त समारंभ २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या समारंभात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जिवनातील व महिलांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान केली जाणार आहे. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.

देशभरात महिलांसाठी विद्यादानाचे कार्य करणाऱ्या एसएनडीटी महाविद्यालयाला काही वर्षांपूर्वीच विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे विविध मार्ग खुले करून उत्तरोत्तर अधिक प्रगती केली आहे. या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची यशोगाथा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे यंदाच्या दीक्षांत समारंभामध्ये महाजन यांना डी.लिट्. पदवी प्रदान करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. या समारंभात पदवी, पदव्युत्तर, पदविका तसेच डॉक्टरेट पदवीधारकांना प्रदान केल्या जातील.

संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात योगदान दिलेल्या डॉक्टरेट पदवीधारकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी दिली. या वर्षी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाला नॅककडून ए श्रेणी प्राप्त झाली असून अध्यापन, संशोधन, सुशासन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचे कार्य याची दखल घेण्यात आली आहे.