व्यवसाय टिकवण्यासाठी समाजमाध्यमे, तंत्रज्ञानाची कास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पारंपरिक पद्धतीने मसाले कांडून देणाऱ्या लालबाग येथील मसाले बाजाराने आता कात टाकली आहे. ग्राहकांची पायपीट वाचवून संकेतस्थळे, समाजमाध्यमांवरून मागणी नोंदवून घेतली जात आहे आणि ग्राहकाने निवडलेल्या कच्च्या मसाल्यांचे कांडण दूरचित्र माध्यमातून दाखवण्यासाठीही व्यापारी प्रयत्न करत आहेत.

बाजारात जगभरातील व्यंजनांसाठी लागणाऱ्या मसाल्यांचे विविध ब्रँड्स उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक घरातील स्वयंपाक घराला गंध आणि चवीतून स्वतंत्र ओळख मिळवून देणारा मसाला पिढीजात प्रक्रिया आणि प्रमाणानुसार कांडून घेतला जातो. लालबाग येथील मसाला बाजारात लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायात होते. यंदा मात्र प्रवासावरील निर्बंध आणि सकाळी ७ ते ११ दरम्यानच दुकान सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे ग्राहक मसाले बाजारा पोहचू शकले नाहीत. ग्राहकांना त्यांच्या प्रमाणात कांडलेला मसाला थेट घरपोच देण्यासाठी व्यावसायिक प्रयत्न करीत आहेत. तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांचा वापर करून ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत. संकेतस्थळे, व्हॉट्सअ‍ॅप, समाजमाध्यमांवरून मागणी नोंदवून घेणे, त्यानुसार मसाले कांडून घरी पोहोचवणे असा मार्ग व्यावसायिकांनी शोधला आहे. निवडलेल्या जिनसांचा, सांगितलेल्या प्रमाणात,

डोळ्यासमोर मसाला कांडून मिळणे ही या पारंपरिक बाजारपेठेची खासियत. ग्राहकांच्या डोळ्यासमोर मसाला कांडून देण्यासाठी दूरचित्रसंवाद माध्यमांचा वापर करण्यासाठी व्यावसायिक प्रयत्न करत आहेत.

‘समाजमाध्यमांसोबतच आम्ही स्वत:चे संकेतस्थळ तयार केले आहे. त्या माध्यमातून मुंबईतलाच नव्हे तर जगभरातला कुठलाही ग्राहक त्याला कशा प्रकारचा मसाला हवा आहे, यातले जिन्नस कोणते, रंग- चव याचे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. जिनसाचे भाव, दर सगळ्याची माहिती तेथे दिलेली असेल. त्यानुसार निवड करून ग्राहकांना देयकही तिथेच भरता येईल. त्यानंतर सांगितलेल्या वेळेवर ग्राहकांना मसाला घरपोच मिळेल. अशी व्यवस्था आम्ही केली आहे,’ असे ‘चव्हाण ब्रदर्स मसाले’चे विक्रम चव्हाण यांनी सांगितले.

प्रगत तंत्रज्ञानाच्या दिशेने

पायडंकापासून सुरुवात झालेला मसाले बाजारात आज आठ पाऱ्यांच्या (मुसळ) लोखंडी डंकावर मसाले कांडले जातात. करोनाने इथे अनेक बदल घडवले. लोकांचा वावर कमी झाल्याने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागले. येत्या काळात घरबसल्या आपण मागणी केलेला मसाला डंकावर कसा तयार होतो आहे, हेदेखील ग्राहकांना पाहता येईल, अशी यंत्रणा उभी करण्यात येत आहे. घरबसल्या खरेदीकडे असलेल्या नव्या पिढीचा कल करोनाकाळाने व्यावसायिकांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

समाजमाध्यमांनी तारले

गेल्यावर्षीसारखी यंदाही व्यवसायाची अवस्था बिकट झाली असती, परंतु समाजमाध्यमांनी व्यावसायिकांना तारले. आज बहुतांशी व्यावसायिकांनी फेसबुक, इंस्टा, यू टय़ूबचा आधार घेऊन ग्राहकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे येणारे निम्म्याहून अधिक ग्राहक हे समाजमाध्यमांवरील आमचा आशय पाहून आले आहेत. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मसाला कशा पद्धतीने तयार केला जातो, याची एक चित्रफीत आम्ही तयार केली आहे. तसेच मसाले घरपोच देण्यासाठी कर्मचारीही वाढवण्यात आले आहेत. अजित गायकवाड, सचिव, लालबाग बाजारपेठ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media technology use to sustain lalbaug s spice market business zws
First published on: 14-05-2021 at 02:50 IST