दरमहा ५० हजार युनिट वीज निर्मिती; एक तृतीयांश विजेची बचत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या नरीमन पॉईंट येथील एनसीपीए अर्थात ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट’च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. एनसीपीएच्या इमारतीच्या गच्चीवर तब्बल ५० हजार युनिट इतकी वीज निर्माण होईल इतक्या क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे. यामुळे संस्थेला दरवर्षी लागणाऱ्या विजेपैकी तब्बल एक तृतीयांश विजेची बचत करणे शक्य होणार आहे.

नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’ या वास्तूच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. इतक्या क्षमतेचे फार थोडे प्रकल्प सध्या मुंबईत कार्यरत आहे. ‘एनसीपीए’च्या छतावर बसविलेला वार्षिक ४५० केव्ही क्षमतेच्या या प्रकल्पातून महिन्याला सुमारे ५० हजार युनिट वीज निर्मिती होणार असल्याचे ‘एनसीपीए’चे अध्यक्ष खुश्रु सुंतूक यांनी  सांगितले.

टाटा थिएटर, जमशेद भाभा अ‍ॅण्ड एक्सपेरिमेंटल थिएटरच्या इमारतींवर हे पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीजखर्चासाठीचे तब्बल ५० ते ५५ लाख रुपये वाचतील असा अंदाज आहे. एनसीपीएचे संकुल समुद्रापासून जवळ  असल्याने जोरदार वाऱ्यांच्या माऱ्यात, विशेषत: पावसाळ्यात ही पॅनेल टिकून राहावी या दृष्टीने तजवीज करणे हे आव्हान होते. या शिवाय येथील इमारतींची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आहे. परंतु, ताशी १८० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा मारा झेलण्याची क्षमता या पॅनेलमध्ये आहे. त्यांचे आयुष्य २० ते २५ वर्षे असणार आहे. वांद्रे येथील अवेस्ता सोलर यांनी हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यासाठी ३.२ कोटी रुपये इतका खर्च आला.

कृषिक्षेत्रात चार हजार ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर

ऊर्जा संवर्धन करणे ही काळाची गरज बनली असून शाश्वत ऊर्जेसाठी सौर ऊर्जेचा वापर होणे आवश्यक आहे. कला व संस्कृती क्षेत्रातील संस्थांनी अशा समाजोपयोगी उपक्रमात पुढाकार घेणे ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. सौर ऊर्जा क्षेत्रात आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असून त्याचा उपयोग या ऊर्जेच्या वापरासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कृषी क्षेत्रात चार हजार ठिकाणी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar plant in ncpa building
First published on: 31-03-2017 at 01:46 IST