लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: विक्रोळी पूर्व येथे २३ वर्षीय तरूणाने केलेल्या मारहाणीत पित्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती असे तपासात निष्पन्न झाले.
संजय पुंडलीक साळवे (५२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विक्रोळी पूर्व येथील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरातील हरियाली व्हिलेज येथील रहिवासी होते. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी त्यांचा मुलगा राहुल साळवे (२३) याला अटक केली आहे. याप्रकरणी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण संजय सावळे यांची बहिण नंदा साळवे (५३) यांनी केलेल्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा- मुंबई : म्हाडा नियोजन प्राधिकरणाकडून पाच वर्षांत साडेतीन हजार कोटींचा महसूल
संजय साळवे रविवारी सकाळी घरी होते. त्यावेळी राहुलने त्यांना मारहाण केली होती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे संजय साळवे खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासात राहुलने केलेल्या मारहाणीत संजय यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राहुलला राहत्या घरातून अटक केली. राहुल बेरोजगार असून त्याचे वडिलांसोबत सतत भांडण होत होते, असे काही साक्षीदारांच्या चौकशीतून निष्पन्न झाले. याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करीत आहे.