मुंबई : यंदा गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. यंदा पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन होत असून हा एक दिवस कमी करण्यात आला आहे. तसेच पुण्यात पाच दिवसांची परवानगी दिली असताना मुंबईवर मात्र अन्याय करण्यात आला आहे. मुंबईबाबत दुजाभाव न करता एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून हे ध्वनिक्षेपक लावता येतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी ११ दिवसांची यादी फेब्रुवारी महिन्यात जाहीर केली होती. त्यात यंदा मुंबईत गणेशोत्सव कालावधीत केवळ तीनच दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे तीन दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे तीनही दिवस विसर्जनाचे दिवस आहेत. यंदा गौरी गणपतींचे पाच दिवसांनी विसर्जन होत असल्यामुळे सातव्या दिवशी दिली जाणारी परवानगी रद्द करण्यात आली आहे. यावर गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात पाच दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. मग मुंबईला दुसरा न्याय का असा सवाल अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केला आहे.