मुंबई: मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मोसमी वारे या चार पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग, बंगाल उपसागराचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग तसेच मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग नैऋत्य मासमी वारे व्यपतील अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मोसमी वाऱ्यांनी सोमवारपर्यंत श्रीलेंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात वाटचाल केली होती. मालदीव आणि कोमोरिनच्या आणि बंगाल उपसागराच्या काही भागातही मोसमी वाऱ्यांनी मजल मारली होती. मात्र, मंगळवारी मोसमी वारे त्याच जागेवर थिजले होते.
दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मासमी वारे २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होतील. गोव्यामध्ये १ जूनपर्यंत, तर महाराष्ट्रात मुंबई येथे ५ जूनपर्यंत मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.
दरम्यान, केरळमध्ये मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवमान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आदी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते ( म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) त्यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.