मुंबई : राज्यात दोन आठवडे उशिराने दाखल झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवडय़ात रखडण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता असून, दुबार पेरण्यांसाठी कृषी विभागाने सज्जता ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात यंदा उशिरा पावसाचे आगमन झाले असून, अजूनही २० जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षी याच काळात १६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पाऊस नसल्याने आतापर्यंत केवळ अडीच टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही जिल्ह्यांत अजूनही पाऊस नाही. त्यातच जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात असल्याची माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.