मुंबई :अमेरिकेतील न्यायालयाने सुरू केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईमध्ये अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हस्तक्षेप करण्याचे आणि कारवाईला स्थगिती मागण्याचे आदेश द्यावेत ही पंजाब अँड नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या बहिणीची मागणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

हेही वाचा >>> रिवॉर्ड पॉइंटच्या नावाने महिलेची ऑनलाइन फसवणूक, अंधेरीतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी मेहता ही अमेरिकेत वास्तव्याला असून नीरव मोदीविरोधातील प्रकरणात माफीचा साक्षीदार झाली आहे. माफीचा साक्षीदार झाल्यानंतर तिने विशेष न्यायालयात अर्ज करून उपरोक्त मागणी केली होती. गेल्या एप्रिल महिन्यात तिने हा अर्ज केला होता. मात्र फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत मेहता हिची मागणी मान्य करून तिला दिलासा देणारी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे मेहता हिला दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. देशातील किंवा विदेशातील कोणतेही न्यायालय अशा करावाईपासून दिलासा देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले. ती येथील प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे. परंतु या प्रकरणाचा आणि अमेरिकेतील प्रकरणाचा संबंध नाही. त्यामुळे मेहता ही उपरोक्त दिलासा मागू शकत नाही, असेही न्यायालयाने तिला दिलासा नाकारताना स्पष्ट केले. दरम्यान, पीएनबी बँक आणि ईडीच्या वतीने मेहता हिच्या अर्जाला विरोध करण्यात आला. तिच्या मागण्या वाजवी नसल्याचा दावाही दोन्हींकडून करण्यात आला.