मुंबईहून एर्नाकुलमला जाणारी दुरंतो गाडी मडगावजवळ घसरल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा वेगमर्यादा घालण्यात आली आहे.
 याआधी मे महिन्यात दिवा-सावंतवाडी गाडीला झालेल्या अपघातानंतर आणि गणेशोत्सवात मालगाडी घसरल्यानंतर घालण्यात आलेली वेगमर्यादा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच उठवली होती. मात्र कोकणात जाणारा मार्ग १०० किमी प्रतितास या वेगासाठी सक्षम नसल्याचे लक्षात आल्यावर आता पुन्हा एकदा या मार्गावर वेगमर्यादा घालण्यात यावी, अशी सूचना रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे.
 याबाबत निर्णय झाल्यास उन्हाळी सुटय़ांच्या निमित्ताने धावणाऱ्या विशेष गाडय़ांसह नेहमीच्या गाडय़ांनाही फटका बसणार आहे. मुंबईहून एर्नाकुलम येथे जाणाऱ्या दुरंतो गाडीचे दहा डबे शनिवारी मडगावजवळ घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या मार्गावरील देखभाल दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर काही वेगमर्यादा टाकण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण रेल्वेमार्गावर ताशी १०० किमी वेगाने गाडी चालवणे प्रवाशांच्या दृष्टीने धोक्याचे आहे. याआधी आपण या मार्गावर टाकलेली वेगमर्यादा उठवली होती. मात्र ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा आपण कोकण रेल्वेला वेग कमी करण्याबाबत सूचना दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाला घ्यायचा आहे, असे चेतन बक्षी यांनी सांगितले. मात्र याबाबत कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed limit for konkan railway
First published on: 09-05-2015 at 04:55 IST