ST bus Shivai hit Corona virus China Effect import of bus Mumbai print news ysh 95 | Loksatta

चीनमधील करोनाचा एसटीच्या ‘शिवाई’ला फटका; बसगाड्यांच्या सांगाड्याच्या आयातीवर परिणाम

चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि काही शहरांमध्ये ऑक्टोबरपासून पुन्हा लागू झालेली टाळेबंदी यामुळे विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांच्या सांगाड्याच्या (बसची चासिस) आयातीवर परिणाम होऊ लागला आहे.

चीनमधील करोनाचा एसटीच्या ‘शिवाई’ला फटका; बसगाड्यांच्या सांगाड्याच्या आयातीवर परिणाम
(‘शिवाई’ बस )( संग्रहित छायचित्र )

सुशांत मोरे

मुंबई : एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली ‘शिवाई’ वातानुकूलित बस पुणे – अहमदनगर मार्गावर सुरू केली असून येत्या डिसेंबरपासून मुंबई-पुणे मार्गावर ‘शिवाई’ बस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस होता. मात्र चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि काही शहरांमध्ये ऑक्टोबरपासून पुन्हा लागू झालेली टाळेबंदी यामुळे विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांच्या सांगाड्याच्या (बसची चासिस) आयातीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत येऊ घातलेल्या एसटीच्या ‘शिवाई’ला विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डिसेंबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भविष्यात या मार्गावर १०० ‘शिवाई’ बस चालवण्याचे नियोजन आहे.

इंधनावरील खर्च कमी करणे, प्रदुषणुक्त प्रवासासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित ‘शिवाई’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्याने विजेवर धावणाऱ्या १५० बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात ५०, तर दुसऱ्या टप्प्यात १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत. ५० बसपैकी दोन बसगाड्या पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर नुकत्याच चालवण्यात आल्या. या मार्गाबरोबरच मुंबई, ठाणे-पुणे मार्गावरही एकूण १०० शिवाई बस चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई-पुणे मार्गावर येत्या डिसेंबरपासून ‘शिवाई’ बस चालवण्यात येतील, अशी माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र आता या बसगाड्या ताफ्यात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली

एसटीच्या शिवाई बसगाड्यांच्या बांधणीचे काम भारतातील दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांचा सांगाडा या कंपन्या चीनमधून आयात करतात. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर चीनमध्ये करोनाचा प्रकोप झाला असून चीनमधील काही शहरात टाळेबंदी लागू झाली आहे. त्यामुळे बसगाड्यांचा सांगाडा वेळेत आयात होऊ शकला नाही. अशीच स्थिती नोव्हेंबरमध्ये कायम होती. परिणामी, चीनमधील कंपनीने बसगाड्यांच्या सांगाड्याच्या पुरवठ्यासाठी मुदत वाढविण्याची विनंती एसटी महामंडळाला नोव्हेंबरमध्ये केली आहे. महामंडळाने मुदत वाढविल्यानंतर या कंपनीने डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ३० बसगाड्यांच्या सांगाड्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली होती. कंपनीने ३० बसगाड्यांचे सांगाडे उपलब्ध केले असून उर्वरित बसचे सांगाडे मिळण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे आता डिसेंबरऐवजी नव्या वर्षातच ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटने २५ कोटी रुपयांची इमारत अशी बळकावली…

चीनमधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बसच्या सांगाडाच्या आयातीवर परिणाम झाला होता. ही समस्या काही प्रमाणात सुटली असून नव्या वर्षात विजेवर धावणाऱ्या काही वातानुकूलित बस दाखल होतील, अशी माहिती एसची महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

१०० ‘शिवाई’पैकी ९६ बस मार्गावर चालवण्याचे नियोजन केले आहे.

दादर – पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड – २४ बस

परेल – स्वारगेट – २४ बस

ठाणे – स्वारगेट – २४ बस

बोरिवली – स्वारगेट – २४ बस

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 18:04 IST
Next Story
आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार