पुरस्कारासाठीच्या नव्या निकषांनी शिक्षक हैराण
तुम्ही शिक्षक आहात? राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला मिळावा, असे तुम्हाला वाटते? तर मग तुमच्या शाळेचा वा वर्गाचा निकाल १०० टक्के हवा, तुमच्या शाळेत डिजिटल क्लासरूम हवी, शाळेत हात धुण्याची सोय हवी, अल्पबचत-कुटुंबकल्याण अशा कामांसाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेले हवेत! यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शालेय शिक्षण विभागाने असे एकापेक्षा एक अजब निकष जारी केले असून, त्यामुळे राज्यातील शिक्षक हैराण झाले आहेत.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, अपंग शाळा शिक्षक, आदिवासी शाळेत शिकविणारे शिक्षक, कला-क्रीडा शिक्षक, आदर्श शिक्षिका आणि स्काऊट व गाइड शिक्षक अशा सर्वच प्रकारच्या पुरस्कारांसाठी समान निकष ठरवून देण्यात आले आहेत. असे एकूण १५ निकष असून त्या प्रत्येकास ५ ते १० असे गुण देण्यात आले आहेत. एकूण १२५ गुण शिक्षकांना मिळवायचे आहेत. या निकषांत देणग्या जमा करणे, शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रसिद्धी, प्रथितयश नियतकालिक किंवा वृत्तपत्रातील लेखन, प्रथितयश प्रकाशकाने प्रसिद्ध केलेले पाच ग्रंथ, शिक्षण हक्क कायद्यातील १० घटकांपैकी विशिष्ट घटकांची पूर्तता अशा निकषांचा समावेश आहे. शिक्षक ज्या वर्गाला शिकवतो, किंवा जो विषय शिकवितो त्याचा १०० टक्के निकाल नसल्यास त्याचा या पुरस्कारासाठी विचारही केला जाणार नाही. मुख्याध्यापकांच्या बाबतीत ही अट नववी, दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या १०० टक्के निकालाची आहे. त्यामुळे अनेक लहान शाळांमधील शिक्षक पुरस्कारांपासून वंचित राहण्याची भीती आहे.
सन २०१५-१६या शैक्षणिक वर्षांकरिता जुन्या निकषांनुसार प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया डिसेंबर, २०१५मध्येच संपली. त्या अनुषंगाने जुन्या निकषांनुसार शिक्षकांनी प्रस्ताव तयार करून शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. मात्र, २१ जुलै रोजी, शिक्षकांचे नव्या निकषांनुसार ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव स्वीकारले जातील, असे जाहीर झाले. त्यामुळे, शिक्षकांना नव्याने प्रस्ताव सादर करावे लागत आहेत. जुन्या निकषांनुसार प्रस्तावासाठी केलेली मेहनत पाण्यात गेली, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली. तसेच, निवड झालेल्या शिक्षकांना मुलाखत, कामाचे सादरीकरण अशा परीक्षाही शिक्षण अधिकाऱ्यांसमोर द्याव्या लागणार आहेत. ही पद्धत या पुरस्काराची प्रतिष्ठा घालविणारा आहे, अशी नाराजी एका शिक्षिकेने नोंदवली.
मुहूर्त हुकणार?
आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता पात्र शिक्षकांकडून शिक्षण संचालक स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येतात. संचालक स्तरावरील छाननी समिती या प्रस्तावांचा विचार करून राज्य सरकारकडे पुरस्कारासाठी शिफारस करते. हे पुरस्कार १५ ऑगस्टला जाहीर करून प्रत्यक्षात ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी वितरित करण्यात येतात. परंतु, अद्यापि प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया चालूच असल्याने १५ ऑगस्टला पुरस्कारांच्या घोषणेचा मुहूर्त साधणार कसा, असा प्रश्न आहे.
जुने निकष असे होते..
मान्यताप्राप्त शाळेत सहाय्यक शिक्षकांसाठी सलग १५ वर्षे तर मुख्याध्यापकांसाठी कमीत कमी २० वर्षे सेवा ही किमान पात्रता. विद्यार्थीगळती रोखण्यासाठी, निकाल वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, नवोपक्रम, परिणामकारक वर्ग अध्यापन, बुद्धिमान व कमकुवत विद्यार्थ्यांकरिता केलेले प्रयत्न, सेवांतर्गत प्रशिक्षण, पुरस्कार, बक्षिसे, लेखन, समीक्षण, अभ्यासक्रम पूरक वा अभ्यासेतर उपक्रम, शाळेच्या भौतिक विकासासाठी संघटन.
वशिल्यातून नव्हे, तर शिक्षकांची निवड अधिक चांगल्या निकषांच्या आधारे व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिक्षकांची कामगिरी चांगली असेल तर चार-आठ दिवसात तो प्रस्ताव तयार करू शकतो. उत्तमोत्तम शिक्षकांची निवड या पुरस्काराकरिता व्हावी, यासाठी शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करूनच हे निकष ठरविण्यात आले आहेत.
-विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री