अर्थव्यवस्थेतील मरगळ झटकून टाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने अर्थव्यवस्थेला चालना देणारे उपाय करण्यात येत असल्याने याचा परिणाम शेअर बाजार वधारण्याच्या रुपाने दिसून आला आहे. आज (सोमवार) बाजार सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा शेअर बाजाराने उसळी घेतली असून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) निर्देशांक सेन्सेक्सने १३०० अंकांनी उसळी घेतली आणि तो ३९०४६.२० वर पोहोचला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) निफ्टीमध्येही वाढ होऊन तो ११,५०० च्या पार पोहोचला.

कोटक महिन्द्रा एएमसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इक्विटी रिसर्चर विभागाचे प्रमुख शिबानी कुरिअन यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. याबरोबरच जुलै महिन्यांत वाढवण्यात आलेल्या टॅक्स सरचार्ज हा इक्विटी शेअर्सच्या विक्रीमुळे मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर लागू होणार नसल्याने त्याचा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला.

अर्थतज्ज्ञांच्या मते, कॉर्पोरेट टॅक्समधील कपातीमुळे या वर्षी डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ६ ते ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते. टॅक्स कमी झाल्यामुळे कंपन्यांच्या फायद्यात वाढ होईल. त्याचा परिणाम मागणीमध्ये वाढ होईल.

दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी उद्योग क्षेत्राला दिलासा देताना २८ वर्षात पहिल्यांदाच कंपनी करात कपातीची घोषणा केली. तसेच अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे १.४५ लाख कोटी रुपयांचा प्रोत्साहक डोस देण्याचा प्रयत्न केला. त्याचा तत्काळ परिणाम शेअर बाजारावर दिसून आला होता. भांडवली बाजारात निर्देशांकांनी दशकांतील उसळी घेऊन या निर्णयाचे स्वागत केले, तर उद्योगक्षेत्रांतही या संबंधाने उत्साही सूर दिसून आला होता.