मुंबई : कडक व्हिसा नियम आणि स्थलांतराच्या कठोर नियमाची अमलबजावणी केल्यामुळे २०२४ मध्ये सर्वाधिक ५८ हजार भारतीयांनी इंग्लंडला रामराम ठोकला. यामध्ये विद्यार्थी, कामगार आणि अन्य नागरिकांचा समावेश आहे. भारतापाठोपाठ इंग्लंड सोडणाऱ्यांमध्ये चीनमधील नागरिक दुसऱ्या क्रमांकावर आहेत.उच्च शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक इंग्लंडमध्ये जातात.
मात्र मागील वर्षी इंग्लंडने स्थलांतरासंदर्भातील नियमांमध्ये बदल करून त्याची कठोर अमलबजावणी सुरू केली. त्यामुळे शिक्षणासाठी गेलेल्या जवळपास ३७ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्लंडला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ कामानिमित्त इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या १८ हजार आणि अन्य तीन हजार भारतीयांनी इंग्लंड सोडले. विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य अशा एकूण ५८ हजार भारतीय नागरिकांनी इंग्लंड सोडल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या २०२४ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. भारतीयांपाठोपाठ इंग्लंड सोडण्यामध्ये चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक आहे. चीनमधील ४५ हजार नागरिकांनी २०२४ मध्ये इंग्लंडमधून स्थलांतर केले. त्याचबरोबर स्थलांतर करण्यामध्ये नायजेरियन (१६ हजार), पाकिस्तानी (१२ हजार) आणि अमेरिकी (८ हजार) नागरिकांचा समावेश होता.
इंग्लंडने स्थलांतरितांशी संबंधित कायद्यात बदल करून त्याची कठोर अमलबजावणी केल्याने २०२४ मध्ये इंग्लंडमध्ये अन्य देशातून येणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ४ लाख ३१ हजारांने कमी झाले. मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्यांपेक्षा कमी झाले आहे. इंग्लंडचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी स्थलांतर कमी होण्याच्या या घटनेचे ‘विक्रमी घट’ असे वर्णन केले आहे. तसेच मागील सरकारच्या काळात इंग्लंडमध्ये जवळपास १० लाखांपेक्षा अधिक नागरिक राहण्यासाठी आले होते. त्या तुलनेत २०२४ मध्ये मोठी घट झाली आहे. स्थलांतर कायद्यामुळे इंग्लंडमध्ये कायमस्वरुपी वास्तव्यास येणाऱ्यांचे प्रमाण २०२३ मध्ये १० लाख ३३ हजार इतके हाेते. त्यामध्ये २०२४ मध्ये घट होऊन ते ९ लाख ४८ हजारपर्यंत कमी झाले. तर इंग्लंड सोडणाऱ्या नागरिकांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ५ लाख १७ हजार नागरिकांनी इंग्लंड सोडले. तर २०२४ मध्ये ४ लाख ६६ हजार नागरिकांनी इंग्लंडला रामराम ठोकल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या २०२४ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
स्थलांतरविषयक कायद्याची कठोर अमलबजावणी करताना इंग्लंडमधून नागरिकांना हद्दपारी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच इंग्लंडमध्ये बेकायदेशीर काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे आणि हॉटेलमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण कमी करणे, अशा उपाययोजनांची अमलबजावणी केल्याने स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढल्याचे इंग्लंडचे गृह सचिव यवेट कूपर यांनी सांगितले.